एलॉन मस्क यांच्या SpaceX चा ऐतिहासिक पराक्रम

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
टेक्सास
elon musk
अंतराळ संशोधन क्षेत्रात एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स (SpaceX) कंपनीने नवा इतिहास घडवला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून तब्बल २२ तासांचा प्रवास पूर्ण करून परतलेल्या ‘स्टारशिप’ यानाला कंपनीने हवेतच पकडण्यात यश मिळवले. टेक्सासमधील स्टारबेस येथील प्रक्षेपण केंद्रावर उभारलेल्या महाकाय यांत्रिक बाहूंच्या मदतीने हे यान अलगद पकडण्यात आले. अवकाशात गेलेले रॉकेटचे वरचे टप्प्यातील यान अशा प्रकारे पुन्हा प्रक्षेपणस्थळी आणून हवेत पकडण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरीचा व्हिडीओ स्पेसएक्सने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.



स्पेसएक्सच्या स्टारशिप मोहिमेचे हे १५ वे उड्डाण होते. १३ नोव्हेंबर रोजी टेक्सासमधील स्टारबेस येथून स्टारशिपने उड्डाण केले होते. सुमारे २२ तास अंतराळात राहिल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी हे यान पृथ्वीच्या दिशेने परतले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रचंड उष्णतेचा सामना करून ते ढगांमधून बाहेर आले. त्यानंतर यानाने आपली दिशा आणि स्थिती नियंत्रित करत प्रक्षेपणस्थळावरील लाँच टॉवरच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली.

यान जमिनीच्या जवळ येताच त्याच्या इंजिनांनी पुन्हा कार्य सुरू केले. यानाने स्वतःची स्थिती उभी केली आणि वेग कमी करत ते हळूहळू खाली आले. त्याचवेळी लाँच टॉवरवरील दोन महाकाय यांत्रिक बाहू पुढे सरकले आणि त्यांनी स्टारशिपला हवेतच पकडले. ‘चॉपस्टिक आर्म्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या यंत्रणेच्या मदतीने यान सुरक्षितपणे टॉवरमध्ये स्थिर करण्यात आले. यानाची इंजिने बंद झाल्यानंतरही ते यांत्रिक बाहूंमध्ये हवेत लटकलेले दिसत होते. या क्षणी स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी जल्लोष केला.

स्पेसएक्सने या तंत्रज्ञानाला ‘मेचाझिला’ असे नाव दिले आहे. कंपनीने व्हिडीओ प्रसिद्ध करताना, ‘मेचाझिलाने स्टारशिपला पकडले,’ अशा आशयाची पोस्ट केली. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनीही या कामगिरीबद्दल आपल्या चमूचे अभिनंदन केले. संपूर्ण रॉकेट प्रणाली पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे स्पेसएक्सने म्हटले आहे.

या मोहिमेत स्टारशिपने पृथ्वीच्या कक्षेत २६ प्रगत स्टारलिंक व्ही३ उपग्रह सोडले. तसेच यानाच्या उष्णतारोधक आवरणाची स्थिती तपासण्यासाठी काही उपग्रहांवरील कॅमेऱ्यांच्या मदतीने छायाचित्रे आणि व्हिडीओही मिळवण्यात आले. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना यान सुरक्षित राहण्यासाठी या तपासणीचा उपयोग झाला.

मात्र, या मोहिमेत कंपनीला अपेक्षित असलेली दोन्ही टप्प्यांची यशस्वी पुनर्प्राप्ती साधता आली नाही. स्टारशिपच्या खालच्या टप्प्यातील ‘सुपर हेवी’ बूस्टरला पुन्हा प्रक्षेपणस्थळी आणून पकडण्याची योजना होती. मात्र, इंधनाशी संबंधित अडचणीमुळे त्याच्या परतीच्या प्रवासात नियोजित पकड प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर बूस्टरने मेक्सिकोच्या आखातात नियंत्रित जलअवतरण केले आणि उड्डाण समाप्ती यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या घटनेचे कारण शोधण्यासाठी कंपनीकडून तपास सुरू आहे.यापूर्वी स्पेसएक्सने सुपर हेवी बूस्टरला तीन वेळा यशस्वीरीत्या पकडले होते. मात्र, अवकाशातून परतणाऱ्या स्टारशिपच्या वरच्या टप्प्याला अशा प्रकारे पकडण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे बूस्टरची पुनर्प्राप्ती अपयशी ठरली असली, तरी स्टारशिपला हवेत पकडण्यात मिळालेले यश अंतराळ तंत्रज्ञानातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. भविष्यात रॉकेटचे भाग पुन्हा वापरता आल्यास प्रक्षेपणाचा खर्च कमी होण्यास आणि अंतराळ मोहिमांची वारंवारता वाढण्यास मदत होऊ शकते. चंद्र आणि मंगळावरील मोहिमांसाठीही या तंत्रज्ञानाला महत्त्व आहे.