विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली तरच सर्वोदयाचा मार्ग प्रशस्त : डॉ. अय्यंगार

पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात मित्रमिलन सोहळा

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

वर्धा,
sudarshan-iyengar-science-spiritualityबदलत्या जगात माणसाने केवळ ‘माझे, माझे’ असा स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता त्यागभावनेतून जगण्याची गरज आहे. विज्ञान मानवाच्या जीवनात सुख-सुविधा निर्माण करते, तर अध्यात्म माणसाला मानवतेची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देते. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून व्यक्ती, समाज आणि सृष्टीच्या कल्याणाचा विचार करणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसून स्वतःवर नैतिक अंकुश ठेवत इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
 

mitr milan 
येथील ब्रह्मविद्या मंदिरात आयोजित मित्रमिलन सोहळ्याप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते. यावेळी ब्रह्मविद्या मंदिरचे ज्येष्ठ गांधी-विनोबा विचारक गौतम बजाज, आश्रमच्या भगिनी ज्योती बहन, डॉ. उल्हास जाजू, डॉ. पुष्पेंद्र दुबे, डॉ. पराग चोलकर, डॉ. शंकर सान्याल, ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते रमेशभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अय्यंगार पुढे म्हणाले, विज्ञान तर्काच्या आधारावर विविध गोष्टींचा शोध घेते. मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा निर्माण करते. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या दिशेने आणि कोणत्या उद्देशाने करायचा, याचे भान अध्यात्म देते. विज्ञान मानवाच्या विकासाचा मार्ग शोधत असताना अध्यात्म माणसाला मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देते. त्यामुळे या दोन्हींचा समन्वय साधणे काळाची गरज आहे.
अध्यात्म म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नसून प्रत्येक जीवाबद्दल प्रेम, करुणा आणि द्वेषरहित भावना बाळगणे होय. संपत्ती, सोने आणि जमिनीवर केवळ वैयक्तिक मालकीचा आग्रह धरण्याऐवजी त्यांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. याच व्यापक विचारातून भूदान आणि ग्रामदानासारख्या संकल्पना पुढे आल्या. दुसर्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्याऐवजी त्याग आणि समर्पणाची भावना समाजात रुजणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.