बॉक्स ऑफिसवर सूर्या यांची ‘सीन’ सुसाट!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
मुंबई
Suriya
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या यांच्या ‘सीन’ या तमिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत १२७.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाशी स्पर्धा असतानाही ‘सीन’ने प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यश मिळवले आहे. सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे चित्रपट लवकरच १५० कोटींचा टप्पा पार करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘सीन’ने १९.१५ कोटी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढून २०.३५ कोटी रुपयांवर पोहोचला. रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली आणि एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे २३.६५ कोटी रुपयांची कमाई नोंदवण्यात आली. सोमवारीही चित्रपटाची घोडदौड कायम राहिली. या दिवशी २१.४० कोटी रुपये मिळाले. त्यानंतर बुधवारीच चित्रपटाने १०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला.

ताज्या बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, दुसऱ्या शुक्रवारी ‘सीन’ने ६ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, शनिवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होऊन ९.५० कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे नऊ दिवसांतील एकूण कमाई १२७.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि वर्ड ऑफ माउथमुळे त्याच्या कमाईला चांगला हातभार लागत आहे. या कामगिरीच्या जोरावर चित्रपटाने ‘मंदादी’च्या १०२ कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमही मागे टाकला आहे. आता सूर्या यांच्या यापूर्वीच्या ‘विश्वनाथ अँड सन्स’ या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा पार करण्याचे लक्ष्य ‘सीन’समोर आहे.

‘सीन’मध्ये सूर्या यांनी इनबराज नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे आणि खास स्वभावामुळे इनबराज इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तो तुरुंगात पोहोचताच तेथील कैद्यांच्या वागण्यात विचित्र बदल दिसू लागतात. मात्र, कथानकाला निर्णायक वळण तेव्हा मिळते, जेव्हा इनबराजशी संबंधित एक गूढ बाब समोर येते. त्यानंतर त्याला एका तपासाची जबाबदारी स्वीकारावी लागते. या तपासादरम्यान त्याचा संबंध जुन्या प्रकरणाशी येतो. या प्रकरणाचे स्वरूप त्याने यापूर्वी तपासलेल्या हत्यांच्या मालिकेशी मिळतेजुळते असते. त्या हत्यांमागे ‘परफ्यूम किलर’ नावाच्या रहस्यमय मारेकऱ्याचा सहभाग असल्याचे कथानकात दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री नजरिया नाझिम हिचे तब्बल १२ वर्षांनंतर तमिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन झाले आहे. तर नस्लेन याने या चित्रपटातून तमिळ सिनेमात पदार्पण केले आहे. त्याच्या अभिनयाचीही विशेष चर्चा होत आहे.

दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याने ‘सीन’ हा आवर्जून पाहावा असा चित्रपट असल्याचे म्हटल्यानंतर त्याचा मुलगा गौतम घट्टामनेनी यानेही चित्रपटाचे कौतुक केले आहे. गौतमने आपल्या ‘लेटरबॉक्स्ड’ या अकाउंटवर चित्रपटाबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या मते, हा चित्रपट अत्यंत उत्कृष्ट असून सूर्या सध्या सातत्याने दर्जेदार काम करत आहेत. संपूर्ण चित्रपटात मनोरंजनाचा अनुभव मिळतो आणि कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.

विशेषतः सूर्या आणि नजरिया यांच्या अभिनयाचे त्याने कौतुक केले. मात्र, नस्लेनचा अभिनय त्याला सर्वाधिक भावला. एका बाजूला विनोदी, तर दुसऱ्या बाजूला धोकादायक अशा परस्परविरोधी छटा असलेली भूमिका नस्लेनने अतिशय सहजतेने साकारल्याचे गौतमने नमूद केले. चित्रपटाचे छायाचित्रणही उत्कृष्ट असल्याचे सांगताना त्याने विशेषतः क्लायमॅक्समधील दृश्यांचा उल्लेख केला. याशिवाय, २०२६ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील सर्वोत्तम संगीत अल्बमपैकी एक ‘सीन’चा असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. चित्रपटातील सर्व गाणी आणि पार्श्वसंगीत आपल्याला आवडल्याचे त्याने सांगितले.

एकीकडे बॉक्स ऑफिसवरील वाढती कमाई आणि दुसरीकडे कलाकारांसह प्रेक्षकांकडून मिळणारे कौतुक यामुळे ‘सीन’ची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. आता हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा किती दिवसांत गाठतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.