६५० चित्रपट, पाच दशकांची कारकीर्द! ज्येष्ठ अभिनेते गिरी बाबू यांचे निधन

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
मुंबई
Giri Babu
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गिरी बाबू यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या गिरी बाबू यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ६५० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चिरंजीवी आणि पवन कल्याण यांच्यासह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


गिरी बाबू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी फिल्म चेंबरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, मित्र आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, गिरी बाबू यांचे पुत्र आणि अभिनेते रघु बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधताना वडिलांच्या अंत्यसंस्काराबाबत माहिती दिली. वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे अंत्यसंस्कार आंध्र प्रदेशातील रविनुथला या त्यांच्या मूळ गावी केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओंगोल शहराजवळ असलेल्या रविनुथला या गावाशी गिरी बाबू यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. आपले अंतिम संस्कार याच गावी व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडणार असल्याचे रघु यांनी स्पष्ट केले.

वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अल्पावधीत मोठ्या संख्येने लोक आल्याने रघु बाबू भावुक झाले. गिरी बाबू यांचे पार्थिव केवळ दोन ते तीन तासांसाठीच फिल्म चेंबरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, या कमी वेळेतही इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली, याबद्दल त्यांनी सर्वांचे हात जोडून आभार मानले.

वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रघु बाबू यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा उल्लेख केला. १९७३ ते २०२२ या जवळपास ४७ वर्षांच्या कालावधीत गिरी बाबू यांनी चित्रपटसृष्टीत काम केले. या काळात त्यांनी सुमारे ६५० चित्रपटांमध्ये अभिनय केला. चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळातच त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली होती. तेलुगू सिनेमात कृष्णधवल सिनेमास्कोप चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे ते पहिले दिग्दर्शक होते. ‘देवथलारा दीविंचंडी’ हा त्यांचा चित्रपट मोठा हिट ठरला होता. याशिवाय ‘सिम्हा गर्जना’सारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

गिरी बाबू यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक कलाकारांनी फिल्म चेंबरमध्ये उपस्थित राहून त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री अन्नपूर्णा यांनाही यावेळी भावना अनावर झाल्या. त्यांनी रघु बाबू यांचा हात धरून गिरी बाबू यांच्याशी असलेल्या जवळच्या नात्याची आठवण सांगितली. गिरी बाबू हे केवळ सहकलाकार नव्हते, तर त्यांच्यापेक्षा अधिक जवळचे व्यक्ती होते, असे त्यांनी भावुकपणे नमूद केले.

काही काळापूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर गिरी बाबू एकाकी पडले होते. त्याचा त्यांच्या मनःस्थितीवर आणि प्रकृतीवरही परिणाम झाला होता, असे अन्नपूर्णा यांनी सांगितले. गिरी बाबू हे सर्वांचे चांगले मित्र होते. स्वतः जेवण्यापूर्वी इतरांना जेवण देणारा त्यांचा स्वभाव होता, अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अभिनेते विष्णू मांचू यांच्यासह राजशेखर, जीविता, राजीव कनकला, शिवाजी राजा आणि अन्य कलाकारांनीही गिरी बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला नंदिनी रेड्डी दिग्दर्शित ‘अन्नी मांची सकुनामुले’ हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराच्या निधनाने दाक्षिणात्य मनोरंजनविश्वाने एक अनुभवी कलाकार गमावला आहे.