जिल्ह्यात १८२ नवे कुष्ठरोगाचे रुग्ण

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

वर्धा,
wardha-leprosy-detection-campaignकुष्ठ रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत अंतर्गत ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांनी जिल्ह्यातील १३ लाख ४० हजार ३५६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९ हजार ५५१ संशयित रुग्ण आढळून आले असून १८२ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असल्याचे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.
 

krushthrog 
नवीन आढळून आलेल्या शहरी भागातील कुष्ठरुग्णांमध्ये आर्वी शहरात ३, देवळी ४, हिंगणघाट ७, कारंजा ३, पुलगाव ५, समुद्रपूर १, सेलू १ व वर्धा शहरात ११ रुग्ण आढळून आले तर वर्धा तालुक्यात ग्रामीण भागात ३२, हिंगणघाट १७, समुद्रपूर २४, सेलू २१, आर्वी १०, देवळी १४, आष्टी १७ व कारंजा तालुक्यात ११ असे १८२ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू असून या रुग्णांच्या सहवासित असलेल्या ५ हजार ३३६ सहवासीतांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आला आहे.
कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी मोहिमेत सहभाग घेतला तसेच गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन, सरस्वती नर्सिंग कॉलेज पुलगाव, जनता नर्सिंग कॉलेज हिंगणघाटच्या विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रभावी पर्यवेक्षण करण्याकरिता आरोग्य यंत्रणेतील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, कुष्ठरोग विभागातील कुष्ठतंत्रज्ञ, अवैद्यकीय सहाय्यक, पर्यवेक्षक, निमवैद्यकीय कर्मचारी तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता.
वेळेत निदान आणि नियमित औषधोपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे संशयित लक्षणे दिसताच तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. रा. ज. पराडकर यांनी केले आहे.