नवाटोला चेकपोस्टवर २.९५ किलो गांजा जप्त

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
Cannabis
अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकी विरोधात देवरी पोलिसांनी धडक कारवाई करीत २ किलो ९५ ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नवाटोला वनविभागाच्या चेकपोस्टजवळ १५ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, १ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल निरंजन पाटील (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.




रायपूर-नागपूर मार्गावरील नवाटोला गावाजवळील वनविभागाच्या चेकपोस्ट परिसरात संशयिताच्या निळसर रंगाच्या ट्रॅव्हल्स बॅगेची राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. यावेळी बॅगेत खाकी रंगाच्या पॉलीथिनमध्ये गुंडाळलेली दोन पुडकी आढळून आली. त्यात हिरवट रंगाचा, उग्र वास असलेला काड्या, बिया, पाने व चुर्‍याच्या स्वरूपातील ओलसर गांजासदृश पदार्थ मिळून आला. तपासणीत या पदार्थाचे एकूण वजन २ किलो ९५ ग्रॅम भरले. त्याची किमत १ लाख ४ हजार ७५० रुपये, तर बॅगेची किमत २ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी एकूण १ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा भंडारा जिल्ह्यातील असून, सध्या नागपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम करीत आहेत.