दिल्ली
air travel विमान प्रवासाच्या वाढत्या खर्चाचा परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर दिसू लागला आहे. विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांनी हवाई प्रवासाकडे पाठ फिरवली असून, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत देशातील एकूण हवाई प्रवासी वाहतुकीत २.९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. यामध्ये देशांतर्गत प्रवासी वाहतूक १.९ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक तब्बल ७.१ टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रवाशांची संख्या घटण्याबरोबरच विमान कंपन्यांनी उड्डाणांच्या संख्येतही कपात केली आहे.

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या भू-राजकीय तणावाचा विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर निर्बंध आले असून, अनेक विमानसेवांच्या नियोजनात बदल करावे लागले आहेत. परिणामी, विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च वाढला आहे. हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आल्याने प्रवाशांच्या मागणीवर परिणाम झाला आहे.देशातील सर्व विमानतळांवरील विमानांच्या एकूण फेऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत ३.५ टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत १४.२८ लाख विमान फेऱ्या झाल्या होत्या. यंदा याच कालावधीत ही संख्या कमी होऊन १३.७७ लाखांवर आली आहे.
विमान कंपन्यांनी व्यावसायिक गणित लक्षात घेऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी केली आहे. देशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये २.९ टक्के, तर आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये ६.७ टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत विमान उद्योगातील उपलब्ध आसनांची संख्याही पाच टक्क्यांनी कमी झाली आहे.
तिकिटांच्या दरात ४३ टक्क्यांची वाढ
विमान प्रवासाच्या खर्चात झालेली वाढ प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये विमान प्रवासाचे सरासरी भाडे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी अधिक होते. सप्टेंबरमध्येही विमान भाड्यात वार्षिक तुलनेत २९.९ टक्क्यांची वाढ झाली होती.विमान कंपन्यांच्या उत्पन्नावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. इंडिगोच्या प्रति आसन किलोमीटर महसुलात ३४ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी विक्री झालेल्या आसनांच्या संख्येत दोन टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच, तिकीट दर वाढूनही प्रवाशांची मागणी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही.
विमान इंधनाच्या दरात मोठी वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमान टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एटीएफचा दर फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रतिलिटर सुमारे ९१.३९ रुपये होता. नोव्हेंबरमध्ये हा दर वाढून प्रतिलिटर १३८.५० रुपयांवर पोहोचला आहे.इंधनाच्या दरातील वाढ, आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरील निर्बंध आणि विमान कंपन्यांच्या वाढलेल्या परिचालन खर्चामुळे विमान वाहतूक क्षेत्रासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. त्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर आणि प्रवाशांच्या संख्येवर होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
