पुणे,
ajit-pawar-statue-puneदिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या क्षणी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सभेला संबोधित करताना त्या अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार?
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दादांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, "आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि अत्यंत भावुक करणारी गोष्ट आहे." दादांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता
या सोहळ्यातील राजकीय उपस्थितीचीही जोरदार चर्चा रंगली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आले होते. मात्र, प्रकृतीच्या किंवा अन्य कारणांमुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली आणि दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.