शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
अकोला
akola farmer suicide
अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले असून, त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. नापिकी, वाढते कर्ज आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई अशा संकटांचा सामना करणाऱ्या आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तेल्हारा तालुक्यातील शेरी वडनेर येथे दिलीप ज्ञानदेव पवार यांनी राहत्या घराजवळील गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप पवार यांच्याकडे दोन एकर शेती होती. याशिवाय त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तीन दुधाळ जनावरांवरही अवलंबून होता. मात्र, यंदा शेतीत अपेक्षित उत्पादन न झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. त्यातच खासगी कर्जाचा वाढता भार आणि जनावरांसाठी पुरेसा चारा व पाणी उपलब्ध करून देण्याची समस्या अधिक गंभीर झाली होती. दुष्काळसदृश परिस्थिती, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते अडचणीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी घराजवळील गुरांच्या गोठ्यात गळफास घेतल्याची घटना घडली.

या घटनेने शेरी वडनेर गावासह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसमोरील संकट आणि शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नापिकी, कर्जाचा वाढता बोजा आणि पाणी-चाऱ्याची टंचाई यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे जगणे कठीण होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, योग्य शासकीय सहाय्य आणि दिलासा देणाऱ्या उपाययोजनांची गरज असल्याची मागणी या पार्श्वभूमीवर पुन्हा जोर धरत आहे.