पुणे
amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहा पुण्यात दाखल झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या दिग्गज नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात आज तीन महत्त्वाचे कार्यक्रम नियोजित आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापूर्वीच राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले आणि त्यांनीही केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण आणि ओमराजे निंबाळकर यांनीही शहा यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठक सुरू आहे. पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये अमित शहा यांचा मुक्काम असून, याच ठिकाणी या राजकीय बैठका सुरू असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण झाले असते, तर राज्यातील मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलीनीकरणासंदर्भातील चर्चा फेटाळण्यात आली आहे. असे असले तरी राज्यातील राजकीय घडामोडी थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख नेत्यांनी अमित शहा यांच्याशी केलेल्या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती, आगामी रणनीती आणि सत्ताधारी पक्षांमधील समन्वयाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दाही या भेटींमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अमित शहा यांची भेट घेताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळविण्याबाबतही या चर्चेत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमातील संभाव्य उपस्थितीलाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकीकडे अमित शहा यांचा पुणे दौरा, दुसरीकडे फडणवीस आणि शिंदे यांच्यासह महायुतीतील नेत्यांच्या भेटी, तर तिसरीकडे अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम, अशा घडामोडींमुळे पुणे हे राज्याच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. या बैठकांमधून कोणते राजकीय संकेत मिळतात आणि आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते निर्णय घेतले जातात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.