दिल्ली
amitabh bachchan बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि मुंबईतून दोघांना अटक केली आहे. दीपक सिंह उर्फ दीप याला ठाण्यातून, तर विकास ठाकूर उर्फ विकी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. जलसा बंगल्याबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी दीपक याच्यावर सोपवण्यात आली होती, असा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९८४ मधील शीखविरोधी दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी कथितरीत्या केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कटामागील सूत्रधार कोण आहे, आरोपींचे नेमके कोणाशी संबंध आहेत आणि त्यांच्यापर्यंत शस्त्रास्त्रे कशी पोहोचली, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर होणारा संभाव्य गोळीबार टळला आहे. याशिवाय, दिल्लीतील एका उद्योजकावरही गोळीबार करण्याचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही संभाव्य घटनांची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून आरोपींना अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेल्या विकास ठाकूर याचे बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो यापूर्वी अनमोल बिष्णोईसाठी काम करत होता. अनमोलला मुंबईत आणल्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाई केली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर विकास ठाकूर याने टायगर श्रॉफ प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल पंडित याच्यासाठी काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. तसेच, विकास अनमोल बिष्णोईला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असल्याचाही आरोप आहे.दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही आरोपींची नजर असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गँगस्टरकडून सेलिब्रिटींना सातत्याने धमक्या मिळत असल्याने बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.