मुंबई
bigg boss 20 बिग बॉस २०’च्या नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ भागात एलिमिनेशन प्रक्रियेदरम्यान अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. या आठवड्यात घरातील जवळपास सर्वच सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामुळे कोणाचा प्रवास संपणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. मनीष गोयलच्या एलिमिनेशनचीही चर्चा सुरू होती. मात्र, शोचे सूत्रसंचालक सलमान खान यांनी या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सर्वांत कमी मते मिळाल्याने माही विजला तिच्याजवळ असलेल्या दोन लाइफलाइनपैकी एक गमवावी लागली.

या आठवड्यात मनीष गोयल एलिमिनेशनपासून बचावला असून त्याचा बिग बॉसमधील प्रवास पुढे सुरू राहणार आहे. मात्र, माही विजला सर्वांत कमी प्रेक्षकांचे समर्थन मिळाले. तरीही तिला घराबाहेर काढण्यात आले नाही. त्याऐवजी तिची एक लाइफलाइन काढून घेण्यात आली. त्यामुळे आता माहीकडे केवळ एकच लाइफलाइन शिल्लक आहे. आगामी आठवड्यांमध्ये ही परिस्थिती तिच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. पुढील मतदान फेरीत मिळणारी मते आणि प्रेक्षकांचे समर्थन तिच्या खेळासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी माही विजने शोच्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली होती. आपल्यालाच प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल करत तिने शोमध्ये भावनिक प्रतिक्रिया दिली होती. बाहेर आपले कुटुंबही हा कार्यक्रम पाहत असून, आपली प्रतिमा अशा प्रकारे खराब करण्यासाठी आपण शोमध्ये आलेलो नाही, असे तिने म्हटले होते.
दरम्यान, मनीष गोयल आणि नकुल ढुल हे वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये दाखल झाले होते. मात्र, गुल्लूसोबत झालेल्या हाणामारीनंतर नकुलला घरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दुसरीकडे, मनीष स्पर्धेत कायम राहिला आणि हळूहळू घरातील घडामोडींमध्ये सहभागी होऊ लागला. या आठवड्यात त्यालाही एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. घरातील जवळपास सर्व सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. मागील आठवड्यात कॅप्टन असलेली अरिश्फा खान ही एकमेव स्पर्धक नॉमिनेशनपासून सुरक्षित होती.
‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने कनिका मानच्या बोलण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला. काझीने मांडलेल्या मुद्द्याला योग्य ठरवत सलमानने कनिकाला उद्देशून, ‘कनिका, माझ्यासमोर आवाज चढवू नकोस,’ अशा शब्दांत सुनावले. त्यावर कनिकाने माफी मागताना, ‘सर, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते,’ असे म्हटले. मात्र, तिच्या उत्तरातील उपरोधिक सूर सलमानला खटकला. त्याने लगेचच, ‘मला तुझ्याबद्दल वाईट वाटते. हा उपरोध स्वतःजवळच ठेव. तुला स्वतःला खूप हुशार समजतेस का?’ अशा शब्दांत तिची कानउघाडणी केली.
या भागात पतंग कापण्याचा एक टास्कही पार पडला. घरात कोणता सदस्य स्वतःला काहीसा जास्तच शहाणा समजतो किंवा मर्यादा ओलांडत आहे, असे वाटते, अशा व्यक्तीचे नाव स्पर्धकांना घ्यायचे होते. या टास्कमध्ये अनेकांनी कनिका मानचे नाव घेतले. माही विजनेही कनिकाची निवड केली, तर काझी आणि अम्रपाली यांनीदेखील तिच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आगामी भागात कनिका आणि इतर स्पर्धकांमधील वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.