ब्लेसिंग मुजारबानीचा ऐतिहासिक पराक्रम!

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
शारजाह,
blessing muzarabani झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी याने आपल्या भेदक गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकावणारा तो झिम्बाब्वेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने केलेल्या या विक्रमी खेळीमुळे झिम्बाब्वेची स्थिती अधिक मजबूत झाली. विशेष म्हणजे, त्याने यापूर्वीचा डोनाल्ड टिरिपानो याचा विक्रमही मोडीत काढला.
 
cricketer
 
३० वर्षीय मुजारबानीने १६ नोव्हेंबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या सत्राच्या अखेरीस त्याने ७७ चेंडूंत ५५ धावा करून नाबाद राहण्याचा पराक्रम केला होता. आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने ६३ चेंडूंचा सामना केला. हशमतुल्लाह शाहिदीच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने डावातील ८० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
यापूर्वी झिम्बाब्वेकडून कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डोनाल्ड टिरिपानो याच्या नावावर होता. जुलै २०१६ मध्ये हरारे येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने १६२ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या होत्या. मात्र, मुजारबानीने नाबाद ५५ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला. याच यादीत मुजारबानीच्या २०२५ मध्ये आयर्लंडविरुद्ध केलेल्या ४७ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.
मुजारबानीने केवळ वैयक्तिक विक्रमच नोंदवला नाही, तर ग्रॅहम क्रीमरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत झिम्बाब्वेचा डावही सावरला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी नवव्या विकेटसाठी १४५ चेंडूंत ८० धावांची मोलाची भागीदारी केली. यामध्ये क्रीमरने ७७ चेंडूंचा सामना करत २५ धावांचे योगदान दिले. या भागीदारीमुळे झिम्बाब्वेला अडचणीच्या परिस्थितीतून सावरण्यास मदत झाली.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा झिम्बाब्वेची धावसंख्या ६०.५ षटकांत आठ बाद १७७ अशी होती. मुजारबानी आणि क्रीमर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर संघाने लंचपर्यंत ८५ षटकांत आठ बाद २५७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर झिम्बाब्वेने २९५ धावांवर नऊ गडी बाद असताना आपला दुसरा डाव घोषित केला. मुजारबानीने या डावात एकूण ९३ चेंडूंचा सामना करत ५९ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.झिम्बाब्वेने दुसरा डाव घोषित केल्यानंतर अफगाणिस्तानसमोर विजयासाठी ४१८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले. मुजारबानीच्या या खेळीने केवळ झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासात नवा विक्रम नोंदवला नाही, तर खालच्या फळीतील फलंदाजही कसोटी सामन्याचे चित्र बदलू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.