गोंदिया,
Gondia सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवरी तालुक्यातील पुराडा गावात गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रोहित शिवचरण आचले (३३) रा. पुराडा, ता. देवरी असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा ५ नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. यानंतर ७ नोव्हेंबर रोजी सालेकसा पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कुटुंबीयांकडून त्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गावातील लीला कबरलाल मेहर यांच्या शेतात त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहित हा पळसाच्या झाडावर उत्पादित होणारी लाख गोळा करण्याच्या उद्देशाने शेतात गेला असावा. संबंधित झाडाजवळ विद्युत खांब असल्याने त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने पुराडा गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सालेकसा पोलिस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
...