हिंगणघाट,
dam-canal-cement-workवडगाव ते नांद या दोन धरणाना जोडणारा ४५ किमीच्या मार्गाचे आजवर सिमेंटीकरण झाले असते तर ३० ते ३५ टक्के पाणी वाया न जाता शेवटच्या शेतकर्याच्या शेतीपर्यंत पोहोचले असते. परंतु, शासकीय अनास्थेचा हा मोठा दाखला अनुभवायला मिळत असुन त्यामुळे शेतकर्यांना सिंचनापासुन पिकं हाताबाहेर जाऊ देण्याची वेळ ओढवली आहे.
या सिमेंटीकरणाच्या कामासाठी पाटबंधारे विभाग नागपूरकडे १५० कोटी रुपये जमा आहेत. परंतु, या कामाला अनेक वर्षांपासून प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने सिमेंटीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नाही. यापूर्वीही याचं सिमेंटीकरणाच्या कामासाठी शासनाकडून ४५ कोटी रुपयाचा निधी आल्याची चर्चा आहे. परंतु, त्याचे काय झाले याबाबत गूढ आहे.
निम्न वणा हा प्रकल्प वडगाव ते नांद या दोन्ही धरणाचे पाणी मिळून तालुक्यातील चिंचघाटच्या टेलपर्यंत येऊ शकतो. परंतु, त्यासाठी नांद व वडगाव यांनी एकाच वेळी पाणी सोडल्यास ते पाणी टेलपर्यन्त येऊ शकते. परंतु, सरकारी लालफीतशाही कारभारामुळे असंख्य शेतकरी आज पाणी उपलब्ध असूनही रब्बी हंगामाचे पीक घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांमधून शेतकरी कालव्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेती वाचवण्यासाठी आणि उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा व या १५० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता प्रदान करावी अशी शेतकर्यांची मागणी आहे. वडगाव डॅम्पअंतर्गत सिंदी, विखणी, डिग्रज, भोसा, गौळ, पळसगाव, मार्डा, कळमना आणि सालापूर या गावांतील शेतकर्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वडगाव डॅम्प व शेंटेश्वर धरणाच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित वालधुर, सुलतानपूर, कडाजना, उमरी, सातेफळ, पिंपळगाव, कुंभी, येनोरा, रिमडोह, हिंगणघाट, बुरकोनी, चिंचोली, पारडी आणि मानोरा या गावांमधील शेतकरीही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर शेटेश्वर धरणांतर्गत अंतर्गत दहेगाव, समुद्रपूर, हळदगाव, रेनकापूर, मेणखात, कारडा, जाम, औरंगपूर, उब्दा, गव्हा, कोल्ही, चिचघाट, शेंडेस्वर, बेला, तांबारी, कांढली, आजदा आणि शेडगाव या गावांमधील शेतकर्यांचीही पाण्यासाठी धडपड सुरू आहे.
सध्या शेतामध्ये कापूस, तूर, हरभरा अशा विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, ऐन पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कालव्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षभर शेतात कष्ट करून, कर्ज काढून आणि मोठा खर्च करून शेतकरी पीक उभे करतो. मात्र, आवश्यक वेळी पाणी मिळाले नाही तर त्याच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ येते. संबंधीत विभागाने अडलेले पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.