डेटिंग अ‍ॅपवरून हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
honeytrap gang
डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख वाढवून भेटीसाठी बोलावायचे आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला ओलीस ठेवून पैसे उकळायचे, असा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. हनीट्रॅप, खंडणी आणि लुटीच्या या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. एका महिलेसह तिच्या साथीदारांनी एका व्यक्तीला भेटीच्या बहाण्याने जाळ्यात ओढून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करून चार लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.




पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीची डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत महिलेकडून त्याला भेटण्यासाठी बोलावण्यात आले. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ओखला अंडरपास परिसरात महिलेच्या साथीदारांनी त्याला अडवले. त्यानंतर त्याला धमकावून मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. पुढे त्याला गौतमपुरी येथील मस्जिद कॉलनी परिसरातील एका भाड्याच्या घरात नेऊन डांबून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

पीडित व्यक्तीला ओलीस ठेवल्यानंतर आरोपींनी प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली तसेच घटस्फोटाच्या खर्चासाठी चार लाख रुपये देण्याची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता पीडितावर कर्ज काढण्याचा आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा दबावही टाकण्यात आला. या प्रकारामुळे संबंधित व्यक्ती आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. एका आरोपीला अटक केल्यानंतर पीडिताच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून ३ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे या टोळीचा कारभार केवळ खंडणीपुरता मर्यादित नसून आर्थिक फसवणुकीचाही त्यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेप्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चार आरोपींना अटक केली.

दरम्यान, दिल्लीत डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२६ मध्ये आनंद विहार परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या डेटिंग स्कॅमचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात जबरदस्तीने पैसे उकळणे आणि ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली होती.

त्या रॅकेटमध्ये ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये बोलावून त्यांच्याकडून अवाजवी रक्कम वसूल केली जात होती. पीडित व्यक्तीला काही काळ रेस्टॉरंटमध्ये थांबल्यानंतर अचानक सुमारे २१ हजार रुपयांचे मोठे बिल देण्यात आले. संबंधित व्यक्तीने पैसे भरण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्याला धमकावण्यात आले आणि मारहाणही करण्यात आली होती.

सलग उघडकीस येणाऱ्या अशा घटनांमुळे डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या ओळखींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनोळखी व्यक्तींशी भेटताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरोधात कारवाई सुरू केली असून, या टोळीच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे.