इंदूर
diljit dosanjh अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याने इंदूरमधील ‘ऑरा इंडिया टूर २०२६’ या संगीत कार्यक्रमात दिवंगत उर्दू कवी राहत इंदौरी यांच्या प्रसिद्ध शेरमधील ओळी सादर करत लक्ष वेधून घेतले. स्थानिक प्रशासनाने मद्य आणि शस्त्रांचा उल्लेख असलेली त्याची चार गाणी सादर करण्यास मनाई केल्यानंतर दिलजीतने हा शेर ऐकवला. या गाण्यांचा मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत ही बंदी घालण्यात आली होती. कार्यक्रमातील हा व्हिडिओ दिलजीतने सोशल मीडियावर शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.

१५ नोव्हेंबर, रविवारी झालेल्या कार्यक्रमात दिलजीतने राहत इंदौरी यांच्या गाजलेल्या शेरमधील ओळी सादर केल्या. त्याआधी प्रेक्षकांशी संवाद साधताना त्याने गाण्यांवरील निर्बंधांचा उल्लेख केला. ‘हे गाऊ नका, ते गाऊ नका, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही,’ अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्याने राहत इंदौरी यांच्या शेरमधील, ‘हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़ी है; अगर खिलाफ हैं तो होने दो, जान थोड़ी है; सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है,’ या प्रसिद्ध ओळी सादर केल्या. या ओळींमधून त्याने निर्बंधांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याची चर्चा आहे.
दिलजीतच्या चार गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी केली होती. ‘पटियाला पेग’, ‘५ तारा’, ‘केस’ आणि ‘जट्ट उठे फायर करदा’ या गाण्यांमधील आशयाबाबत अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. या गाण्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याने ती कार्यक्रमात सादर करू नयेत, अशी सूचना आयोजकांना करण्यात आली होती. या संदर्भात महिला व बालविकास विभागाने आयोजकांना नोटीसही पाठवली होती.
दरम्यान, दिलजीतच्या इंदूरमधील कार्यक्रमापूर्वी आणखी एक गंभीर घटना घडली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली.
दिलजीतने ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमातून ‘ऑरा टूर’च्या भारतातील टप्प्याची सुरुवात केली होती. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. ‘जी.ओ.ए.टी.’, ‘इक कुडी’, ‘ललकारा’, ‘इश्क दी बाजियां’, ‘नैना’, ‘किन्नी किन्नी’, ‘केस’, ‘पंजतारा’, ‘हस हस’ आणि ‘वॉटर’ यांसारखी लोकप्रिय गाणी त्याने सादर केली. मात्र, ‘सांसों की माला’ हे गाणे सादर करताना प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला.