वॉशिंग्टन
donald trump अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, आता थेट नेतृत्वबदलाची मागणी जोर धरू लागली आहे. रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष ग्रुटर्स यांना पदावरून हटविण्यासाठी पक्षातील एका गटाने हालचाली सुरू केल्याने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या समर्थक पक्षातच नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये प्रत्येक राज्यातून निवडून आलेले एकूण १६८ सदस्य आहेत. मध्यावधी निवडणुकीतील खराब कामगिरीनंतरही वॉशिंग्टनमधील अनेक रिपब्लिकन नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनाची भूमिका कायम ठेवली आहे. मात्र, समितीतील नाराज सदस्यांना पदावरून हटविण्याची मागणी दुसरीकडे पुढे येत आहे. या अंतर्गत संघर्षात बंडखोर गटाने केंटकीचे क्रॉस्बी यांना पाठिंबा दिला आहे. ते सध्या रिपब्लिकन नॅशनल कमिटीतील दुसऱ्या क्रमांकाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे ५ नोव्हेंबरला क्रॉस्बी यांनी पत्र लिहून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील नेतृत्वाच्या प्रश्नाला नवे वळण मिळाले. निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून झालेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली. त्यामुळे हा केवळ पदासाठीचा संघर्ष नसून पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेला प्रश्न असल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, क्रॉस्बी हे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या राजकीय भूमिकेचे समर्थक आहेत. असे असतानाही त्यांनी नेतृत्वबदलाची भूमिका घेतल्याने या घडामोडींकडे ट्रम्प यांच्यासाठी आव्हान म्हणून पाहिले जात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीत विजय मिळवून देणे हे समितीचे मुख्य काम आहे. मात्र, एका विशिष्ट उमेदवाराच्या विजयावरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण पक्षाच्या कामगिरीला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका बंडखोर गटाकडून मांडली जात आहे.
टेनेसी येथील समिती सदस्य ऑस्कर ब्रॉक यांनीही क्रॉस्बी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे ही समितीची जबाबदारी होती; केवळ एका उमेदवारासाठी काम करणे अपेक्षित नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या नेतृत्वात बदल व्हावा, अशी मागणी आता सदस्यांकडून केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, अध्यक्ष ग्रुटर्स यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या कामगिरीचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
व्हर्जिनियाच्या समिती सदस्य पॅट्टी लाइनमॅन यांनीही पक्षाच्या पराभवाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. टेक्सास, दक्षिण कॅरोलिना आणि मिसिसिपी यांसारख्या रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्येही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एवढे मोठे राजकीय नुकसान होऊनही जुन्याच नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निष्ठा कायम ठेवणारे नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी निश्चित करून संघटनात्मक बदल करण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे रिपब्लिकन नॅशनल कमिटीतील हा संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेणार, तसेच अध्यक्ष ग्रुटर्स यांना पदावर कायम ठेवण्यात पक्षाला यश येणार की नेतृत्वबदल होणार, याकडे अमेरिकेतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.