मानोरा
Washim खरीप हंगामात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता दुष्काळाचे संकट शेतकर्यांसह पशुधनावरही ओढवले आहे. डोंगराळ भाग असलेल्या शेंदूरजना आढाव परिसरात चारा आणि पाण्याची टंचाई गंभीर बनली असून, जनावरांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. पिकांपाठोपाठ आता पशुधन जगवण्याचे आव्हान शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे.

आकांक्षीत जिल्ह्यातील सहाही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने परिस्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची मोठी तूट, आटलेले जलस्रोत आणि खरीप पिकांचे नुकसान त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीन, कापूस आणि तूर यासारख्या पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकर्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यातच जनावरांसाठी हिरवा आणि सुका चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील लाखो पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चार्याच्या उपलब्धतेतही मोठी तूट निर्माण झाली आहे. हिरव्या चार्याची उपलब्धता गरजेपेक्षा जास्त टक्कयांनी तर सुक्या चार्याचीही उपलब्धता कमी असल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
जनावरांना जगवण्यासाठी चारा विकत घ्यायचा की कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा गंभीर प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. अनेक शेतकर्यांना जनावरांच्या चार्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेंदूरजना आढाव, रुई - गोस्ता व अन्य दुष्काळग्रस्त गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू कराव्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत, दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पशुधनासाठी अनुदानित दरात चारा पुरवावा, अशी मागणी होत आहे. दुष्काळामुळे शेती आणि पशुधनाच्या दोन्ही बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. केवळ आश्वासनावर न थांबता सरकारने शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.