नागपूर
Fake Medicines Racket नागपुरात कथित बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणाची सुरुवात थेट स्वीडनमधील एका नागरिकाने केलेल्या ई-मेल तक्रारीमुळे झाली. फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या तपासणीत जप्त केलेली औषधे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेऊन आरोपी यश सेवेंद्र बेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. एम. नेलींकर यांनी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला.

अभियोजन पक्षाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक अन्न व स्वाती भारडे यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. २० जून रोजी स्वीडनचे नागरिक टॉमी ब्लोमक्विस्ट यांच्याकडून विभागाला ई-मेल प्राप्त झाला होता. या तक्रारीत त्यांनी इंडियामार्ट या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून मेसर्स स्कायलाइन इम्पेक्स या फर्मकडून औषधांच्या वायल्स खरेदी केल्याचे नमूद केले होते. मात्र, संबंधित औषधांची तपासणी केली असता त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीची गंभीर दखल घेत औषध प्रशासन विभागाने पुढील तपास सुरू केला.
तपासादरम्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित औषधांचे नमुने ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले. प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जप्त करण्यात आलेली औषधे बनावट म्हणजेच स्प्यूरियस असल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षानंतर ५ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, अटक टाळण्यासाठी यश बेरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना बचाव पक्षाच्या वकिलांनी याच फर्ममधील अन्य भागीदार कीतीं सुनील कल्याणी यांनाही उच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या एका स्वतंत्र फौजदारी अर्जात अंतरिम दिलासा दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यश बेरी हेही त्याच फर्मचे भागीदार असल्याने समानतेच्या तत्त्वानुसार त्यांनादेखील अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. हा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने बेरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावून त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यश बेरी यांचा अर्ज सहआरोपीच्या अर्जासोबत सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेशही दिले. जरीपटका पोलिसांकडून याचिकाकर्त्याला अटक करण्यात आल्यास २५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा सक्षम जामीनदार सादर केल्यानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मात्र, हा दिलासा काही अटींच्या अधीन राहणार आहे. आरोपीला दर रविवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यास त्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असेल. तसेच तपासात पूर्ण सहकार्य करणे आणि अभियोजन पक्षाच्या पुराव्यांमध्ये कोणताही हस्तक्षेप न करणे, या अटींचेही पालन करावे लागणार आहे. त्यामुळे स्वीडनमधील नागरिकाच्या तक्रारीवरून उघड झालेल्या बनावट औषधांच्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे सुरू राहणार आहे.