मुंबई,
FDA Action on Mahabaleshwar Hotel महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात तीन नामांकित हॉटेलचे अन्न विक्री परवाने निलंबन करण्यात आले आहेत. यानंतर महाबळेश्वर मधीलच अन्य पाच हॉटेल्सला नोटीसा देऊन त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अचानक झालेल्या कारवाईमुळे संबंधित हॉटेलमधील बुकिंग झालेल्या पर्यटकांची मात्र मोठी कोंडी झाली.
दरम्यान, राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच राज्यात एकापाठोपाठ एक मोठ्या कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी अनेक ठिकाणांवर मोहीम राबवत दोषींवर कारवाई केली आहे. परिणामी हॉटेल व्यावसायिकांनीही त्याचा धसका घेत नियमांचे काटेकोर पालन करण्यास सुरु केली असली तरी अद्याप काही दुकानी त्रुटी आढळून आल्यास कारवाईचा सपाट सुरु आहे, त्यातच आता महाबळेश्वरमध्येही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील त्रुटी आढळून आलेले हॉटेल रामसुख, हॉटेल ब्राईटलँड, आणि हॉटेल एव्हर शाईन या तीन हॉटेलचा समावेश आहे. या सर्व हॉटेलमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे अन्न विक्रीचे परवाने तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. मात्र ऐन सुट्टीमध्ये ही कारवाई झाल्यामुळे पर्यटकांना पर्यायी हॉटेल शोधण्याची वेळ आली आहे.