बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील ५१ हजारांची सोन्याची पोथ लंपास

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
मानोरा,
Gold Necklace
वसंतनगर येथील महिला १३ नोव्हेंबर रोजी अकोला माहेरी जाण्यासाठी बसस्थानकावर आली असता बस मधून गळ्यातील ५१ हजारांची सोन्याची पोथ अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना घडली.




प्राप्त माहितीनुसार, वसंतनगर, मानोरा येथील सारीका संतोष रत्नपारखी (वय ४०) या आशा सेविका असून, त्या पती संतोष रत्नपारखी यांच्यासोबत अकोला येथे माहेरी जाण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान मानोरा बसस्थानकावर आल्या होत्या. अकोल्याला जाणारी बस उशिराने असल्याने त्या बसची प्रतीक्षा करीत होत्या. दरम्यान दुपारी १.३० वाजता दिग्रस-अकोला बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६१०८ बसस्थानकावर आली. पती-पत्नी बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरून नेली. बसच्या पायर्‍या चढल्यानंतर गळ्यातील पोथ गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोथ चोरीला गेल्याचे समजताच त्यांनी पतीला माहिती दिली. पतीने तत्काळ बसचालकाला घटनेची माहिती देऊन बस पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. त्यानुसार बस मानोरा पोलिस ठाण्यात आणण्यात आली. चोरीस गेलेल्या पोथमध्ये सोन्याचे सहा डोरले व गोल सोन्याचे मणी असून, तिची एकूण किंमत ५१ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी रत्नपारखी यांनी पतीसह मानोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, घटनेचा तपास पोलिस करीत आहे.