सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
gold silver price
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी (१६ नोव्हेंबर) बाजार सुरू होताच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव एकाच वेळी ५ हजार ७०० रुपयांहून अधिक घसरला, तर सोन्याच्या दरातही जवळपास एक हजार रुपयांची घट नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एमसीएक्सवर चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. चांदीचा भाव प्रतिकिलो ५ हजार ७०९ रुपयांनी म्हणजेच ३.२० टक्क्यांनी कमी होऊन १ लाख ७० हजार ६०० रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि चांदीच्या मागणीत झालेली नरमाई यामुळे किमतीवर परिणाम होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही सत्रांपासून चांदीच्या दरात सातत्याने कमजोरी दिसून येत असून, सोमवारच्या घसरणीने या प्रवाहाला आणखी बळ मिळाले आहे.

चांदीबरोबरच सोन्याच्या किमतीतही घसरण कायम आहे. सोमवारी सकाळी १० वाजता एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ९५६ रुपयांनी म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून १ लाख ३५ हजार ७४९ रुपयांवर व्यवहार करत होता. किरकोळ बाजारातही सोन्याचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १ लाख ३६ हजार ९५० रुपये होता, तर मुंबईमध्ये हाच दर १ लाख ३६ हजार ८०० रुपये नोंदविण्यात आला. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रतिऔंस ३ हजार ८७४.४२ डॉलर इतका होता.

गेल्या आठवड्यातही सोन्याच्या बाजारात मोठी घसरण झाली होती. या कालावधीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम तब्बल ५ हजार ९५० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५ हजार ४५० रुपयांनी कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत जवळपास ४.५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारासह जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरावर दबाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सलग घसरण होत असल्याने ग्राहकांचे लक्ष आता आगामी दरबदलाकडे लागले आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करण्याची तयारी करणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची ठरू शकते. मात्र, बाजारातील चढ-उतार लक्षात घेता खरेदीपूर्वी स्थानिक सराफ बाजारातील प्रत्यक्ष दर आणि दागिन्यांवरील घडणावळ व इतर शुल्क तपासणे आवश्यक आहे.