india-air-passenger-traffic-declineभारतातील विमान वाहतूक क्षेत्रात एप्रिल ते सप्टेंबर 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत हवाई प्रवासी वाहतुकीत एकूण 2.9 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून, यामध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 1.9 टक्क्यांनी कमी झाली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत तब्बल 7.1 टक्क्यांची तीव्र घसरण पाहायला मिळाली आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम विमान उड्डाणांवरही झाला असून, देशातील सर्व विमानतळांवरील एकूण विमान फेऱ्या 3.5 टक्क्यांनी घटून 13.77 लाखांवर आल्या आहेत, ज्या मागील वर्षी म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 14.28 लाख इतक्या होत्या.

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग विस्कळीत झाले असून हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. या संकटामुळे विमान कंपन्यांनी कामकाजाचे पुनर्नियोजन करताना देशांतर्गत उड्डाणांमध्ये 2.9 टक्क्यांनी तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 6.7 टक्क्यांनी कपात केली आहे. दुसरीकडे, आखाती देशांमधील तणावामुळे विमान टर्बाइन इंधनाचे (ATF) दर मोठ्या प्रमाणात भडकले असून, दिल्लीमध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी इंधनाचा दर फेब्रुवारीमधील अंदाजे 91.39 रुपये प्रति लिटरवरून नोव्हेंबरमध्ये थेट 138.50 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.
इंधनाचा वाढलेला प्रचंड खर्च भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांनी प्रवासी भाड्यात मोठी दरवाढ केल्यामुळे सामान्य प्रवाशांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, ऑक्टोबर महिन्यात सरासरी विमान भाडे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत तब्बल 43 टक्के अधिक होते, तर सप्टेंबर महिन्यात हे भाडे मागील वर्षाच्या तुलनेत 29.9 टक्क्यांनी महागले होते. तिकीट दर गगनाला भिडल्यामुळे विमान प्रवासाची एकूण मागणी मंदावली आहे.