देशातील गोदाम बाजारपेठेत मोठी वाढ पुणे तिसऱ्या क्रमांकावर!

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
पुणे
india warehousing market
देशातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम गोदाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. मालाची साठवणूक आणि वितरणासाठी आधुनिक गोदामांची मागणी वाढल्याने देशातील प्रमुख महानगरांमध्ये या क्षेत्रातील व्यवहारांनी वेग घेतला आहे. चालू वर्षातील जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत देशातील आठ प्रमुख महानगरांमधील गोदामांच्या व्यवहारांत मागील वर्षाच्या तुलनेत १६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोदामांच्या व्यवहारांमध्ये पुण्याने बंगळुरूला मागे टाकत देशात तिसरे स्थान मिळविले आहे.


‘ॲनारॉक ग्रुप’ने प्रसिद्ध केलेल्या गोदाम बाजारपेठेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशातील आठ महानगरांमध्ये एकूण चार कोटी ९५ लाख चौरस फुटांचे निव्वळ गोदाम व्यवहार झाले. मागील वर्षी याच नऊ महिन्यांच्या कालावधीत चार कोटी २६ लाख चौरस फुटांचे व्यवहार नोंदविण्यात आले होते. यंदा व्यवहारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

पुण्याने बंगळुरूला टाकले मागे

गोदाम व्यवहारांमध्ये दिल्लीने २१.८ टक्के वाट्यासह देशात पहिले स्थान मिळविले आहे. मुंबई महानगराचा वाटा १८.५ टक्के, तर पुण्याचा वाटा १७.४ टक्के आहे. या कामगिरीमुळे पुण्याने १५.१ टक्के वाटा असलेल्या बंगळुरूला मागे टाकले आहे. देशातील एकूण गोदाम व्यवहारांपैकी दिल्ली, मुंबई आणि पुणे या तीन शहरांचा मिळून ५८ टक्के वाटा आहे.

इतर शहरांमध्ये चेन्नईचा वाटा १०.७ टक्के, कोलकत्याचा ७.७ टक्के, तर हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांचा प्रत्येकी ४.४ टक्के आहे.

गोदामांच्या भाड्यात पाच वर्षांत २७ टक्के वाढ

देशातील प्रमुख महानगरांमध्ये गोदामांच्या भाड्यांतही वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत गोदामांच्या मासिक भाड्यात सरासरी २७ टक्क्यांची वाढ झाली असून, देशातील सरासरी भाडे प्रतिचौरस फूट २८.१ रुपये झाले आहे.

भाडेवाढीच्या बाबतीत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत गोदामांचे मासिक भाडे प्रतिचौरस फूट ३३ रुपये असून, गेल्या पाच वर्षांत त्यात ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, २०२१ ते २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत दिल्लीत भाडेवाढ केवळ तीन टक्के होती. मात्र, २०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या काळात भाड्यात ४४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू या शहरांमध्येही गेल्या पाच वर्षांत गोदामांच्या भाड्यात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. पुण्यात ही वाढ १७ टक्के असून, चेन्नईत १९ टक्के आणि अहमदाबादमध्ये २० टक्के आहे.

मुंबईतील गोदामे सर्वाधिक महाग

देशातील महानगरांमध्ये मुंबईत गोदामांचे भाडे सर्वाधिक आहे. येथे प्रतिचौरस फूट मासिक भाडे ४३.९ रुपये आहे. याउलट अहमदाबादमध्ये गोदामांचे भाडे सर्वांत कमी म्हणजे प्रतिचौरस फूट १९ रुपये आहे.

‘ॲनारॉक ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक पीयूष जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील गोदामांच्या भाड्यात २०२१ पासून सातत्याने वाढ होत आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवरील सरासरी मासिक भाडे प्रतिचौरस फूट २८.१ रुपये असून, पाच वर्षांत त्यात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे.