जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणात टीएमसीचा नेता अटकेत

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
कोलकाता
jp nadda
भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर १० डिसेंबर २०२० रोजी पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथील शिराखोल परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) नेता इमरान हसन मोल्लाह याला अटक करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी रात्री उस्ती परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पाच वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.



नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात काही लोकांनी वाहनांवर विटा, दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून तोडफोड केली होती. या घटनेत अनेक नेते आणि कार्यकर्ते थोडक्यात बचावले होते. हे प्रकरण तेव्हा देशभरात चर्चेचा विषय ठरले होते.

आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी घटनेतील घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी क्राइम सीन रिक्रिएशन केले. तपासाचा भाग म्हणून इमरान हसन मोल्लाह याला उस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागांत आणि रस्त्यांवरून पायी फिरवण्यात आले. त्या वेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एकेकाळी या भागात प्रभाव असलेला टीएमसी नेता पोलिसांच्या ताब्यात असल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरले.

पोलिस आरोपीला घेऊन रस्त्यावर आले असता तो घाबरलेला दिसत होता. स्थानिक नागरिकांसमोर तो कधी हात जोडून उभा राहत होता, तर कधी वारंवार मान खाली घालून आपल्या कृत्याबद्दल माफी मागताना दिसला. तपासातील घटनाक्रमाची पडताळणी करणे आणि चौकशीत कोणतीही बाब राहू नये, हा या प्रक्रियेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेनंतर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. २०२० मधील बहुचर्चित हल्ला प्रकरणाच्या तपासातील ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.