कुशल बद्रिकेचा समुद्रात १५ ते २० फुटांवरून पडण्याचा थरारक अनुभव

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
मुंबई
kushal badrike
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरांत पोहोचला. अनेक चित्रपट आणि मालिकांमधूनही त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या कुशल त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक थरारक अनुभव कुशलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फ्लायबोर्डिंगचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने या स्टंटसाठी घेतलेल्या मेहनतीचा किस्सा सांगितला आहे.



या चित्रपटाच्या पटकथेत फ्लायबोर्डिंगचा सीन अभिनेता संतोष जुवेकर याच्यासाठी लिहिण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष चित्रीकरणाची वेळ आली तेव्हा हा सीन आपणच करणार, असा हट्ट कुशलने धरला. मित्रांनीही त्याचा हट्ट पुरवला आणि त्याला हा स्टंट करण्याची संधी मिळाली. मात्र, फ्लायबोर्डिंग करणे त्याला वाटले तितके सोपे नव्हते. हा स्टंट करताना कुशल अनेकदा १५ ते २० फूट उंचीवरून खोल समुद्रात पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याची चांगलीच दमछाक झाली. या अनुभवाचा परिणाम इतका झाला की, पुढील आठवडाभर त्याचे अंग दुखत होते.



आपल्या पोस्टमध्ये कुशलने या प्रसंगाचे वर्णन खास विनोदी शैलीत केले आहे. तो म्हणाला, “उशिरा आलेल्या शहाणपणाची गोष्ट! स्क्रिप्टमध्ये हा सीन संतोष जुवेकरच्या नावाने लिहिला गेला होता. पण प्रत्यक्षात जेव्हा शूट करायची वेळ आली, तेव्हा मी हट्ट धरला की हे मला करायचं आहे. माझा हट्ट पुरवला नाही तर ते मित्र कसले.”

पुढे या स्टंटमधील अडचणी सांगताना त्याने म्हटले, “हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. हे करताना पंधरा-वीस फुटांवरून किती तरी वेळा खोल समुद्रात पडलो. नाकातोंडात आणि कुठे कुठे पाणी गेलं, तुम्हाला काय सांगू? पुढे एक आठवडा माझं अंग दुखत होतं. ते म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी! ते खरं आहे.”

या एका छोट्याशा सीनसाठी कुशलला मोठा प्रवासही करावा लागला. तीन तासांचा प्रवास आणि त्यानंतर दोन तासांचे शूटिंग, असा बराच वेळ खर्च केल्यानंतर त्याच्या वाट्याला चित्रपटात अवघ्या दहा सेकंदांचा सीन आला. या अनुभवातील गंमत त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या व्हिडीओ आणि पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

दरम्यान, कुशलचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट नुकताच ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. कुशलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटातील केवळ दहा सेकंदांच्या दृश्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि त्यामागचा थरारक अनुभव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.