जम्मू-काश्मीर
latif-bhatt-encounter जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर मोहम्मद लतीफ भट्ट याचाही समावेश आहे. लतीफ भट्ट अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. काही दिवसांपूर्वी कुलगाममध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याचा खात्मा हा दहशतवादी संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लतीफ भट्टचा सुरू होता शोध
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने राबवलेल्या या मोहिमेत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवानही सहभागी होते. काही दिवसांपूर्वी कुलगाममध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला होता. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह काश्मीरमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याचा शोध भारतीय सुरक्षा दलांकडून घेतला जात होता. त्याचवेळी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काश्मीर दौरा सुरू असल्याने सुरक्षा दलांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर कुलगाममध्ये राबवलेल्या मोहिमेत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
जवानांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट
कुलगाममध्ये ११ नोव्हेंबर रोजी भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड लतीफ भट्ट असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक संदीप खिरवार यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना या कारवाईसंदर्भात माहिती दिली. हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच हल्लेखोरांबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांना आधीच मिळाली होती, असे त्यांनी सांगितले.या मोहिमेत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवादी मारले गेल्याने सुरक्षा दलांसाठी ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. लतीफ भट्ट याचा खात्मा झाल्यानंतर या भागातील दहशतवादी नेटवर्कवर काय परिणाम होतो आणि सुरक्षा दलांकडून पुढे कोणत्या मोहिमा राबवल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.