मुंबई
maharashtra weather update राज्यात हळूहळू थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, रात्री आणि पहाटेच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात किमान तापमानाची नोंद १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आली असून, उत्तर महाराष्ट्रासह घाटमाथ्यावरील परिसरात थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या ‘अकबन’ चक्रीवादळाचा परिणाम विदर्भातील हवामानावर होण्याची शक्यता असून, १९ नोव्हेंबरच्या आसपास या भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा प्रभाव वाढत असतानाच बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांमुळे पावसाचे संकेत मिळत आहेत. बंगालच्या खाडीत तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यातून चक्रीवादळाची स्थिती विकसित होत आहे. या हवामान प्रणालीमुळे विदर्भातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा अनुभव घेत असलेल्या विदर्भातील नागरिकांना येत्या काही दिवसांत पावसाचाही सामना करावा लागू शकतो.
कोकण किनारपट्टीसह मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. या भागांमध्ये पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी आकाश निरभ्र राहण्यासोबतच वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुमारे १८ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या भागांत तापमानातील चढ-उतारासोबत दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना थंडीबरोबरच उकाड्याचाही त्रास जाणवू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रातही दिवसाचे तापमान आणि रात्रीचा गारवा असे संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक परिसरात कमाल तापमान सुमारे ३१ अंश, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या तापमानात घट होत असली तरी दुपारच्या वेळी उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याने नागरिकांना दिवसा उन्हाचा सामना करावा लागेल.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सध्या या विभागासाठी कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, तापमानाचा पारा हळूहळू खाली येत असल्याने थंडीचा प्रभाव वाढत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यासही सुरुवात केली आहे.विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३२ ते ३३ अंश, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये दिवसा तापमानाचा पारा तुलनेने अधिक राहणार असल्याने उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अशा परिस्थितीत विदर्भात एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांमुळे पावसाचे सावट निर्माण झाले आहे.एकूणच, राज्यातील विविध विभागांमध्ये तापमानाचे वेगवेगळे स्वरूप पाहायला मिळत असून, काही भागांत पहाटेचा गारवा वाढत आहे, तर काही ठिकाणी दुपारचे उष्ण हवामान कायम आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अकबन’ चक्रीवादळामुळे १९ नोव्हेंबरच्या सुमारास विदर्भात पावसाची शक्यता असल्याने आगामी दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याचे संकेत आहेत.