गोंदिया,
Arrested शहरातील गौतम बुद्ध वार्ड परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्या एका आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. १६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. नागसेन बोधीमन्तो (४४) रा. गौतम बुद्ध वार्ड, श्रीनगर, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि मॅगझीन जप्त करण्यात आले.
गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पथक नियमित गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून गौतम बुद्ध वार्डातील लक्ष्मीनगर परिसरात एक इसम पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुशील कळबे यांच्या दुकानासमोर आरोपी नागसेन हा संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत एक पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त करीत आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.