मातीकला बोर्ड व आरक्षणासाठी लढा उभारू

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |

वर्धा,
mati-kala-board-demandमातीकला बोर्डाची स्थापना व विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केला.
सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीने हॉटेल ज्ञानेश्वरी आळेफाटा, पुणे येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष कल्याण कुंभार, प्रदेश सरचिटणीस सुभाष तेटवार, प्रदेश उपाध्यक्ष चंदनलाल प्रजापती, कोर कमिटी अध्यक्ष अॅड. संजय रुईकर, स्वागताध्यक्ष राजेंद्र जाधव, सरचिटणीस रमेश बुरबांदे, ओमप्रकाश पांडे, चंद्रकला चिकाणे, आदी उपस्थित होते.
 

matikala 
संजय गाते पुढे म्हणाले, सर्व जिल्हाध्यक्षांनी शासन निर्णयाचा सूक्ष्म अभ्यास करून समाजातील तळागाळातील बांधवांपर्यंत लाभ पोहोचवावा. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गठित करण्यात येणार्या ९ सदस्यीय शासकीय सनियंत्रण समितीसाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षाने अनुभवी व सक्रिय कार्यकत्र्यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवावी. सन २०१८ मध्ये संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्ड व त्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. तसेच २०१९ मध्ये तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेच्या अभिभाषणात कुंभार समाजासारख्या वंचित समाजाच्या आरक्षणाची मागणी योग्य कालावधीत पूर्ण करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले होते.
मात्र, या दोन्ही बाबींची अंमलबजावणी शून्य असल्याची खंत व्यक्त करीत धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जन्मभूमी व समाधीस्थळाचा तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार विकास करण्यास शासनाला बाध्य करण्याची भूमिका परिषदेने घेतल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार व जनजागृती करून लवकरच जिल्हास्तरावर राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला देण्यात येईल, असेही गाते म्हणाले.
यावेळी सुभाष तेटवार यांनी संघटनात्मक रचनेची माहिती दिली. चंदनलाल प्रजापती यांनी मातीकला बोर्डाच्या स्थापनेमुळे कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाच्या विकासासोबतच सर्वांगीण विकासाची दारे खुली होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अॅड. संजय रुईकर यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास कोर कमिटी सदस्य म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नावे जाहीर करण्यात आली. तसेच नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.