लातूर
microfinance company दुष्काळामुळे शेळीपालनासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने एका शेतमजुराच्या घराला टाळे ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील ममदापूर येथील नवनाथ बोईने यांच्या कुटुंबाला गेल्या आठ महिन्यांपासून घराबाहेर राहावे लागत असल्याने या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे

.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. बोईने यांनी कर्जाचे दहा हप्ते नियमित भरले होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हप्त्यांची परतफेड करता आली नाही. त्यानंतर संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीने त्यांच्या घराला टाळे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.एका बाजूला दुष्काळामुळे रोजगार आणि उत्पन्नाचे साधन कमी झाले असताना दुसऱ्या बाजूला कर्जवसुलीसाठी कुटुंबाला घराबाहेर काढणे अन्यायकारक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. संबंधित कंपनीवर तातडीने फौजदारी कारवाई करून कुटुंबाला घराचा ताबा परत मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. या प्रकरणात कारवाई न झाल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमधून दिला आहे.