नागपूर,
nagpur-researchers-forensic-gait-analysisगुन्ह्याच्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित व्यक्तीचे चित्रण झाले, मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यास पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे राहते. अशा परिस्थितीत संशयिताच्या चालण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून त्याची ओळख निश्चित करण्यास मदत होऊ शकते. याच संकल्पनेवर आधारित 'फॉरेन्सिक गेट अॅनालिसिस' या वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास नागपूरमधील संशोधकांनी केला आहे. गुन्हे तपासात ही पद्धत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेतील डॉ. आशिष बढये, प्राची कठाणे आणि डॉ. केवल कृष्ण यांनी हे संशोधन केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चालण्याची विशिष्ट शैली असते. या शैलीतील वैशिष्ट्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून संशयित व्यक्तीबाबत महत्त्वाचे निष्कर्ष काढता येऊ शकतात, असे या संशोधनाचे स्वरूप आहे.
### प्रत्येकाच्या चालण्याची पद्धत वेगळी
एखादी व्यक्ती चालताना पावले कशी टाकते, दोन पावलांमधील अंतर किती असते, चालण्याचा वेग किती आहे, यावरून तिच्या चालण्याची वैशिष्ट्ये निश्चित करता येतात. याशिवाय पाय जमिनीवर ठेवण्याची पद्धत, शरीराचा तोल सांभाळण्याची हालचाल, हातांची हालचाल आणि पावलांची लय यांचाही अभ्यास केला जातो.
या सर्व घटकांचे एकत्रित विश्लेषण केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या चालण्याची स्वतंत्र ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नसतानाही तपासासाठी उपयुक्त ठरणारे संकेत मिळू शकतात.
### सीसीटीव्ही फुटेजच्या तुलनेतून मिळणार धागेदोरे
चोरी, घरफोडी किंवा हल्ल्यासारख्या घटनांमध्ये संशयित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असते. मात्र, अनेकदा कॅमेऱ्याचा कोन, अंतर किंवा अन्य कारणांमुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही. अशा वेळी संशयिताच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करता येते.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रणातील चालण्याची पद्धत आणि संशयित व्यक्तीच्या अन्य उपलब्ध व्हिडीओमधील चाल यांची तुलना केली जाते. त्यासाठी पावलांची लय, त्यांच्यातील अंतर तसेच शरीराच्या विविध हालचालींमधील साम्य तपासले जाते. या तुलनेतून संशयिताच्या ओळखीबाबत तपास यंत्रणांना महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.
### पायांचे ठसेही ठरणार तपासात उपयुक्त
केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे, तर घटनास्थळी आढळणारे पायांचे ठसे आणि पादत्राणांचे ठसेदेखील तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. अनवाणी पायांचे किंवा चपला-बुटांचे ठसे मिळाल्यास त्यांचा स्वतंत्रपणे वैज्ञानिक अभ्यास करता येतो.
ठशांचा आकार, त्यांची रचना, जमिनीवर पडलेला दबाव आणि दोन पावलांमधील अंतर या बाबींचे विश्लेषण करून संबंधित व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळवता येते. चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण आणि पायांच्या ठशांचा अभ्यास या स्वतंत्र वैज्ञानिक प्रक्रिया आहेत. मात्र, दोन्ही पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास गुन्ह्याच्या तपासाला अधिक ठोस दिशा मिळू शकते.
### चालण्याच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता
फॉरेन्सिक गेट अॅनालिसिस ही उपयुक्त पद्धत असली, तरी तिच्या काही मर्यादाही आहेत. प्रत्येक व्यक्तीची चाल प्रत्येक परिस्थितीत सारखीच राहील असे नाही. थकवा, आजारपण, पादत्राणांचा प्रकार तसेच रस्त्याच्या पृष्ठभागानुसार चालण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो.
त्यामुळे केवळ चालण्यातील साम्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरविणे योग्य ठरणार नाही. या विश्लेषणाला इतर वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आधुनिक संगणकीय प्रणालींची जोड देणे आवश्यक आहे. अशा पूरक पुराव्यांच्या आधारे फॉरेन्सिक गेट अॅनालिसिसचा वापर केल्यास गुन्हेगाराची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत तपास यंत्रणांना मदत होऊ शकते.