‘पंचायत ५’साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
मुंबई
Panchayat Season 5 update
ओटीटी विश्वात अनेक वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यापैकी ‘पंचायत’ ही लोकप्रिय वेबसीरिज विशेष चर्चेत राहिली आहे. या मालिकेचे आतापर्यंतचे चारही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे आता चाहत्यांना पाचव्या सीझनची उत्सुकता लागली होती. २०२६ मध्येच हा नवा सीझन प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर केलेल्या घोषणेमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.


प्राइम व्हिडीओने १५ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करत ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनबाबत माहिती दिली. पहिल्या फोटोमध्ये ‘पंचायत सीझन ५ यावर्षी प्रदर्शित होणार नाही’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मालिकेतील बनारस हे पात्र हात जोडून उभे असल्याचे दिसते. या फोटोंसोबत प्राइम व्हिडीओने खास कॅप्शनही लिहिले आहे. “तुम्हाला कळवण्यास खेद वाटतो की, ‘पंचायत’चा पुढचा सीझन थांबवण्यात आला आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे २०२६ मध्ये पाचवा सीझन पाहायला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाचव्या सीझनमध्ये फुलेरा गावात नवे राजकारण?

‘पंचायत’चा चौथा सीझन एका रंजक वळणावर संपला होता. त्यामुळे पाचव्या सीझनमध्ये फुलेरा गावातील राजकारण कोणते नवे वळण घेणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मालिकेत सचिवजींची भूमिका जितेंद्र कुमार यांनी साकारली आहे. तर प्रधानाच्या भूमिकेत रघुबीर यादव आणि मंजू देवीच्या भूमिकेत नीना गुप्ता दिसतात. याशिवाय सान्विका, फैसल मलिक, दुर्गेश कुमार आणि चंदन रॉय यांच्याही अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

चौथ्या सीझनच्या अखेरीस कथानकात अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. फुलेरा गावाचे उपप्रधान प्रह्लाद पांडे यांची भूमिका साकारणारे फैसल मलिक आता आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे कथानकात दाखवण्यात आले. तसेच बनराकसची पत्नी गावाची नवी प्रधान बनली आहे. त्यामुळे आगामी सीझनमध्ये गावातील राजकीय समीकरणे कशी बदलणार आणि सचिवजींच्या आयुष्यात कोणती नवी आव्हाने येणार, हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता होती.मात्र, प्राइम व्हिडीओच्या नव्या घोषणेमुळे या उत्सुकतेला काही काळासाठी विराम मिळाला आहे. ‘पंचायत ५’ यंदा प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी नव्या सीझनच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे फुलेरा गावातील पुढील गोष्टी पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.