पंढरपूर
pandharpur well collapse पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चार मजूर त्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, तब्बल १२ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये सिद्धू घाडगे यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप एका मजुराचा शोध लागलेला नसून त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

विहिरीचा ढिगारा कोसळल्यानंतर चार मजूर त्याखाली अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. मात्र, परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने स्थानिक यंत्रणांना मजुरांपर्यंत पोहोचण्यात यश आले नाही. त्यामुळे पुण्यातून एनडीआरएफच्या विशेष पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाने रात्रीपासूनच शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. विहिरीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यासोबतच त्यामध्ये अडकलेले मोठमोठे दगड जवानांसाठी अडथळा ठरत आहेत.
एनडीआरएफसमोर बचावकार्याचे मोठे आव्हान
दुर्घटनेला १२ ते १४ तास उलटूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व मजुरांपर्यंत पोहोचणे बचाव पथकाला शक्य झाले नव्हते. ढिगाऱ्यातील मोठमोठे दगड सुरक्षितपणे बाजूला काढून पुढील शोधमोहीम राबवणे हे एनडीआरएफच्या जवानांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पथकाकडून काळजीपूर्वक बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विहिरीच्या बांधकामावेळी मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा सवाल उपस्थित केला आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे बंधनकारक असावे, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री एक वाजता घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विहिरींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असले तरी अद्याप एक मजूर ढिगाऱ्याखाली अडकलेला आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या दुर्घटनेमुळे आंबे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.