भारतातील १० हजार वन्यजीव रक्षकांना विमा कवच

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
मुंबई
wildlife rangers
वन्यजीव आणि नैसर्गिक अधिवासांच्या संरक्षणासाठी दुर्गम जंगलांमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वनरक्षकांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतातील सात राज्यांमधील १० हजार कंत्राटी तसेच तात्पुरत्या वन्यजीव रक्षकांना पुढील पाच वर्षांसाठी अपघात, अपंगत्व आणि जीवन विम्याचे संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. राजपुत्र विल्यम यांच्या ‘रॉयल फाउंडेशन’अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘युनायटेड फॉर वाइल्डलाइफ’ या उपक्रमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.




२०१६ नंतर राजपुत्र विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन हे शाही दांपत्य प्रथमच एकत्र भारत दौऱ्यावर येत आहे. विल्यम यांच्या भारत दौऱ्याची सांगता झाल्यानंतर गुरुवारी या विमा उपक्रमाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. शाही दांपत्याचे संपर्क सचिव ली थॉमसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वन्यजीव संवर्धनासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या कल्याणालाही महत्त्व देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे.

देशातील अनेक वन्यजीव रक्षकांना दुर्गम आणि धोकादायक जंगलांमध्ये काम करावे लागते. वन्यप्राण्यांची शिकार रोखणे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये तातडीने हस्तक्षेप करणे तसेच प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात. या कामांमध्ये त्यांच्या जीविताला आणि आरोग्याला मोठा धोका असतो.

मात्र, कायमस्वरूपी नियुक्त वनकर्मचारी आणि कंत्राटी अथवा तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे वनरक्षक यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. परिणामी, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण मिळत नाही. कर्तव्य बजावताना गंभीर दुखापत होणे, कायमचे अपंगत्व येणे किंवा मृत्यू होणे अशा दुर्घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन सात राज्यांमधील १० हजार तात्पुरत्या वन्यजीव रक्षकांना वैयक्तिक अपघात विमा, अपंगत्व विमा आणि जीवन विम्याचे संरक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील संस्था, विमा क्षेत्रातील संघटना आणि सार्वजनिक क्षेत्रातील संबंधित यंत्रणांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

दरम्यान, राजपुत्र विल्यम यांनी यापूर्वीही वनरक्षकांच्या सुरक्षिततेसाठी अशाच प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहेत. २०२४ मध्ये केपटाऊन येथे त्यांनी आफ्रिकेतील वनरक्षकांसाठी सहाय्य कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर मागील वर्षी रिओ येथेही अशाच स्वरूपाचा उपक्रम घोषित करण्यात आला. आफ्रिकेतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत सहा हजार ८०० हून अधिक वनरक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षणासह विविध कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पालकांशी कॅथरीन साधणार संवाद

राजपुत्र विल्यम यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आलेल्या प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांचाही दौरा विविध महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित असणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रमांबरोबरच बालकांचे आरोग्य, बालवयातील प्रारंभिक विकास आणि मातृत्व आरोग्य या मुद्द्यांना त्या प्राधान्य देणार आहेत.

बुधवारी (१८ नोव्हेंबर) मुंबईतील हस्तकला केंद्राला भेट दिल्यानंतर कॅथरीन एका प्रसूतिगृहाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान त्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, पालक आणि कुटुंबीयांशी संवाद साधून बालकांचे आरोग्य आणि मातृत्वाशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत.