मुंबई
salman khan बॉलिवूड अभिनेते शरद कपूर सध्या आरोग्याच्या समस्यांमुळे कठीण परिस्थितीतून जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून आजारपण आणि गंभीर शारीरिक दुखापतींमुळे त्यांना अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले आहे. या संकटाच्या काळात बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान आणि सोनू सूद त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. दोघांनीही शरद यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

सलमान खानने घेतली प्रकृतीची विचारपूस
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने शरद कपूर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना आर्थिक मदत देण्याची तयारीही दर्शवली आहे. दुसरीकडे, सोनू सूदने शरद यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे. उपचारांसाठी डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास तो मदत करत असल्याचे सांगितले जाते.शरद कपूर यांच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. त्यांना मेंदूशी संबंधित त्रास असून पायालाही गंभीर दुखापत झाली होती. बार्सिलोना येथे फुटबॉल खेळताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांच्या शारीरिक अडचणींमध्ये वाढ झाली आणि त्यांना कामापासून दूर राहावे लागले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू सूद १५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी शरद कपूर यांची भेट घेणार होता. या भेटीत दोघांमध्ये संभाव्य चित्रपट किंवा नवीन प्रकल्पाबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय सोनूने शरद यांच्या उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याची व्यवस्था केल्याचेही वृत्त आहे.
एका वृत्तानुसार, सोनू शरद यांच्या प्रकृतीची आणि गरजांची सातत्याने माहिती घेत आहे. तसेच त्यांच्या पायाच्या उपचारांसाठी डॉक्टरांचे पथक उपलब्ध करून देण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, सोनू आणि शरद यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे की नाही, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.सलमान खानकडून आर्थिक मदतीचा हात, तर दुसरीकडे सोनू सूदकडून उपचारांसाठी सहकार्य मिळत असल्याने शरद कपूर यांच्यासाठी हा कठीण काळ काहीसा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. आता या मदतीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना पुन्हा अभिनय क्षेत्रात परतता येते का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.