शेअर बाजारातील AI वापरावर येणार SEBI चे नियंत्रण

गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी लवकरच नवीन नियमावली

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |

मुंबई,
sebi-ai-stock-market-guidelinesसध्या शेअर बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या निर्णयांपासून ते बाजाराच्या विश्लेषणापर्यंत एआय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, या वाढत्या वापरामुळे गुंतवणूकदारांची सुरक्षितता, जबाबदारी आणि संभाव्य सायबर धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, बाजार नियामक ‘भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ’ (SEBI) लवकरच एआयच्या जबाबदार वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहे. नवी दिल्ली येथील 45 व्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2026’ (IITF 2026) मध्ये सेबीच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन करताना अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी ही माहिती दिली. तांत्रिक नवोपक्रमाला चालना देण्यासोबतच गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, हा या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे.
 

sbi 
प्रस्तावित नियमावलीमध्ये एआयच्या सुरक्षित वापरासाठी काही ठोस मर्यादा निश्चित केल्या जातील. यामध्ये प्रामुख्याने 3 बाबींवर भर दिला जाणार आहे. पहिले म्हणजे, एआयच्या वापराबाबत पारदर्शक माहिती देणे बंधनकारक असेल. दुसरे म्हणजे, सेबीच्या अखत्यारीतील संस्थांची जबाबदारी निश्चित केली जाईल. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘ह्युमन-इन-द-लूप’ म्हणजेच मानवी देखरेखीची प्रणाली अनिवार्य असेल. याचा अर्थ असा की, एआय तंत्रज्ञान कामात मदत करत असले तरी अत्यंत महत्त्वाचे आर्थिक निर्णय पूर्णपणे मशीनवर सोपवले जाणार नाहीत; त्यावर मानवी नियंत्रण कायम राहील.
यापूर्वी जून 2025 मध्ये सेबीने एआय आणि मशीन लर्निंगच्या वापराबाबत एक सल्लागार पत्र प्रसिद्ध केले होते. बाजारातील आर्थिक स्थिरता अबाधित राहावी, यासाठी सेबी प्रयत्नशील आहे. एआय नियमावलीसोबतच सेबी सायबर हल्ले आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून होणाऱ्या डिजिटल फसवणुकीवरही करडी नजर ठेवून आहे. वाढत्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सेबीने मे 2026 मध्ये ‘इन्सिडेंट रिस्पॉन्स मेकॅनिझम’ ही नवीन प्रणाली लागू केली आहे. ही यंत्रणा आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असून, यामुळे सायबर घटनांचा अहवाल देणे आणि त्यावर त्वरित कारवाई करणे अधिक सोपे झाले आहे.