मुंबई
sonu sood प्रकृती अस्वास्थ्य आणि कामाच्या अभावामुळे अडचणींचा सामना करणारे अभिनेते शरद कपूर यांच्या मदतीसाठी अभिनेता आणि निर्माता सोनू सूद पुढे आला आहे. शरद यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर सोनूने मुंबईतील वांद्रे येथे त्यांची भेट घेतली. या भेटीत त्याने शरद यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याची व्यवस्था केली. तसेच, संभाव्य चित्रपट प्रकल्पाबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे शरद कपूर यांच्या अभिनय क्षेत्रातील पुनरागमनाच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शरद कपूर यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते अत्यंत अशक्त आणि भावूक अवस्थेत दिसत होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि निर्मात्यांकडे काम व आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यांच्या या आवाहनाची दखल घेत सोनू सूदने त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
‘द फ्री प्रेस जर्नल’च्या विशेष वृत्तानुसार, शरद यांचा मदतीची विनंती करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनूने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे ठरवले होते. सोमवारी सोनू वांद्रे येथील शरद यांच्या निवासस्थानी पोहोचला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सोनूच्या मदतशील भूमिकेचे अनेकजण कौतुक करत आहेत. सोनूने शरद यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याची व्यवस्था केल्याचेही वृत्त आहे. संभाव्य चित्रपट प्रकल्पाबाबत नेमकी काय चर्चा झाली किंवा शरद यांना कोणते काम मिळणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, शरद यांच्या प्रकृतीविषयीचा आणखी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांचे चार पाळीव कुत्रे प्राणी कल्याण केंद्रात पाठवण्यात येत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसले. त्या वेळी शरद भावूक झाले होते. त्यांची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.
त्यानंतर शनिवारी ‘बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट’ने शरद यांचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी आपण नैराश्याच्या अवस्थेतून गेल्याचे सांगितले. गेल्या काही काळापासून मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी चित्रपटसृष्टीतील लोकांना काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विनंतीनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेही चित्रपट निर्मात्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शरद यांच्या प्रतिभेला साजेसे काम देऊन त्यांना मदत करावी, असे संघटनेने म्हटले होते.
शरद कपूर यांनी ‘मेरा प्यारा भारत’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्री सुष्मिता सेननेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर शरद यांनी ‘तमन्ना’, ‘जोश’, ‘खौफ’, ‘क्योंकि... मैं झूठ नहीं बोलता’, ‘जानी दुश्मन : एक अनोखी कहानी’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते मोठ्या पडद्यावर सक्रिय नाहीत.
२०२४ मध्येही शरद कपूर एका वादामुळे चर्चेत आले होते. एका ३२ वर्षीय महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. मात्र, शरद यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केल्यामुळे शरद यांच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत नवी सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.