वर्धा,
Wardha यावर्षीचा पावसाळा जवळपास कोरडाच गेला. त्यामुळे भीषण पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये यावर्षी वाळूघाटांचे लिलाव करू नये तसेच नदीतील वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी करुणाश्रमचे संचालक आशिष गोस्वामी यांनी केली असून यासंदर्भातील निवेदन संबंधित मंत्री तसेच जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

यावर्षी आलेली नैसर्गिक आपत्ती पाहता पाणी वाचविण्याचे तसेच पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं असताना नागरिकांचा पिण्याचा पाणीहक्क मोठा आहे. वाळू ही बांधकामासाठी जरी आवश्यक असली तरी पाणी ही प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाची गरज आहे. बांधकामासाठी पर्यायी साधनं शोधता येतात. पण, नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट झाले तर ते पुन्हा निर्माण करणं अत्यंत कठीण असते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना शेतीसाठी, जनावरांना पिण्यासाठी आणि नागरिकांना पिण्यासह दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होणे ही प्राथमिक गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वाळू उपशाला परवानगी देऊ नये. तसेच यावर्षी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये वाळूघाटांचे लिलाव थांबवावे, अशी मागणी राज्यातील संबंधित मंत्री, जिल्हा प्रशासन आणि अधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने पाणीटंचाईवर तातडीने लक्ष देऊन महसुलाच्या उद्देशासाठी नैसर्गिक जलसंपत्तीवर ताण पडू नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. ही मागणी कोणत्याही व्यावसायिकाच्या विरोधात नसून, ती शेतकरी, सामान्य नागरिक, पशुधन, पर्यावरण आणि पुढच्या पिढ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी आहे. आपण आजच जलस्त्रोत वाचवले, तर उद्याच्या पिढ्यांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा करुणाश्रमचे संचालक आशिष गोस्वामी यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.