मुंबई
top 5 highest-grossing indian movies भारतीय चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपटही कमाईचे नवनवे विक्रम करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, हजार कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट नाही. ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’, ‘पुष्पा २ : द रूल’ आणि ‘बाहुबली २ : द कन्क्लूजन’ यांसारख्या चित्रपटांनीही जागतिक बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

‘सॅकनिल्क’च्या बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत आमिर खानच्या ‘दंगल’ने अव्वल स्थान कायम राखले आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल २,०७०.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला परदेशात, विशेषतः चीनमध्ये, मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही त्याचा जागतिक कमाईचा विक्रम कोणत्याही भारतीय चित्रपटाला मोडता आलेला नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा स्पाय अॅक्शनपट आहे. या चित्रपटाने जगभरात १,८१३.३९ कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या बॉक्स ऑफिस यशांमध्ये या चित्रपटाची गणना होत आहे.
प्रभास, राणा दग्गुबाती आणि अनुष्का शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बाहुबली २ : द कन्क्लूजन’ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने जगभरात १,७८८.०६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. भव्य निर्मिती, दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
अल्लू अर्जुन अभिनीत ‘पुष्पा २ : द रूल’ने जागतिक स्तरावर १,७४२.१० कोटी रुपयांची कमाई करत चौथे स्थान मिळवले आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाला मिळालेल्या लोकप्रियतेचा या सिक्वेलला मोठा फायदा झाला. भारतासह परदेशातील प्रेक्षकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
या यादीत पाचव्या क्रमांकावर रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपट आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटगृहांमध्ये त्याची कमाई अद्याप सुरू असल्याने अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे ‘रामायण’ आणि ‘धुरंधर २’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना, आमिर खानच्या ‘दंगल’चा जागतिक विक्रम अद्याप अबाधित आहे. त्यामुळे आगामी काळात कोणता भारतीय चित्रपट हा विक्रम मोडणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.