मुंबई,
uran-platinum-warehouse-fireरायगड जिल्ह्यातील उरण येथे भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. सोमवारी दुपारच्या सुमारास प्लॅटिनम लॉजिस्टिक्सच्या गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या गोदामामध्ये केमिकलचा साठा असल्याने आग लागल्याने प्रचंड स्फोटांनी परिसर हादरला. आकाशामध्ये धुरांचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिक्सच्या गोदामाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामामध्ये केमिकलचा साठा असल्याने काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. प्रचंड स्फोट झाल्याने आगीच्या ज्वाळा क्षणार्धात आकाशात पसरल्या.
आकाश काळ्याकुट्ट धुराने भरून गेले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. गेल्या साडे तीन ते चार तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी सांगितले.