लखनौ
yogi adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील जनतेशी पत्रांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला आता ५० आठवड्यांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री असूनही जनतेला नियमितपणे पत्र लिहिण्याची गरज त्यांना का वाटली, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी योगी आदित्यनाथ यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशातील २५ कोटी नागरिक हेच आपले कुटुंब असून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा, यश आणि संकल्प जाणून घेण्यासाठी ‘योगी की पाती’ हे आत्मीय संवादाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या ५० हून अधिक आठवड्यांपासून प्रत्येक पत्राच्या माध्यमातून आपण राज्यातील नागरिकांसोबत आपले विचार आणि भावना व्यक्त करीत आहोत. हा उपक्रम केवळ पत्रलेखनापुरता मर्यादित नसून, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी आहे. या विशेष संवादप्रवासावर आधारित ‘योगी की पाती’ या कॉफी टेबल बुकचे सोमवारी प्रकाशन करण्यात येणार असून, त्यासोबत आयोजित प्रदर्शनाचे आभासी उद्घाटनही होणार आहे.
जनतेला पत्र लिहिण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली, याविषयी सांगताना मुख्यमंत्र्यांनी वनटांगिया गावाच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आठवला. ते म्हणाले की, पहिल्यांदा वनटांगिया गावात गेलो होतो, तो प्रसंग आजही स्मरणात आहे. कोल, गोंड, मुसहर, थारू आणि बुक्सा यांसारख्या वंचित समाजातील नागरिकांचे हलाखीचे जीवन पाहून आपण अत्यंत व्यथित झालो होतो. अनेक वर्षांपासून हे लोक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र होते. या परिस्थितीमुळे शासनाची खरी जबाबदारी केवळ योजना तयार करणे किंवा सरकारच्या कामगिरीची आकडेवारी मांडणे एवढीच नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची जाणीव झाली. कारण व्यवस्थेपर्यंत अनेकदा सर्वसामान्यांच्या वेदना आणि अपेक्षा पोहोचत नाहीत. या अनुभवातूनच सरकार आणि जनता यांच्यात सातत्यपूर्ण संवाद तसेच संवेदनशील नाते असणे आवश्यक असल्याची भावना अधिक दृढ झाली. ‘योगी की पाती’ या उपक्रमामागील प्रेरणाही याच विचारातून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि राज्यातील २५ कोटी नागरिक यांच्यातील संबंध केवळ सरकारी सूचना किंवा औपचारिक संवादापुरते मर्यादित राहू नयेत, ही आपली भूमिका असल्याचेही योगी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश हे केवळ प्रशासकीय राज्य नसून एक कुटुंब आहे. कुटुंबात आदेश देण्याऐवजी आपुलकीने संवाद साधला जातो. त्यामुळे नागरिकांचे जीवन, त्यांच्या आकांक्षा आणि नव्या उत्तर प्रदेशाच्या भविष्याशी संबंधित विषयांवर जनतेशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रांच्या माध्यमातून नागरिकांचे सुख-दुःख समजून घेणे, परस्पर विश्वास वाढविणे आणि लोकसहभाग अधिक मजबूत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात लिहिलेली पत्रे ही केवळ स्वतःच्या विचारांची अभिव्यक्ती राहिलेली नाहीत, तर राज्यातील जनभावना समजून घेण्याचे आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे माध्यम ठरली आहेत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. या संवादाची दखल उत्तर प्रदेशच्या सीमांपलीकडे देशातील विविध भागांत घेतली जात असल्याचे पाहून विशेष आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी दीपोत्सवाच्या निमित्तानेही मुख्यमंत्र्यांनी जनतेला पत्र लिहिले होते. त्या पत्रातून त्यांनी दीपोत्सवाचा खरा अर्थ आणि सणामागील भावना मांडल्या होत्या.
दरम्यान, ‘योगी की पाती’ या उपक्रमाला नागरिकांकडून मिळणारे प्रेम आणि विश्वास हीच आपली सर्वांत मोठी ताकद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ही पत्रे केवळ मुख्यमंत्र्यांच्या विचारांचे व्यासपीठ न राहता, त्यामध्ये नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि सूचनांनाही समान स्थान मिळावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेचा आवाज हीच या पत्रांची खरी ताकद असून, नागरिकांचा सहभाग वाढल्यास हा संवाद अधिक अर्थपूर्ण आणि जनभावनांचे प्रतिनिधित्व करणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
सरकार आणि समाज यांच्यातील अंतर कमी करून परस्पर विश्वासाचा मजबूत पूल निर्माण करण्यासाठी या संवादमालिकेला अधिक बळ देण्याचे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. सर्वांनी एकत्रितपणे अशा उत्तर प्रदेशच्या उभारणीचा संकल्प करावा, जो समृद्धीच्या बाबतीत देशात आघाडीवर असेल आणि संस्कारांच्या बाबतीतही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘तुमचा योगी आदित्यनाथ’ या शब्दांत त्यांनी आपल्या पत्राचा समारोप केला.