मालेगाव,
35-year-old-laborer-killed राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील अमानी गावाच्या पुलावर मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणार्या ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृतकाची ओळख भूपेंद्र कुमार मडावी वय ३५ वर्षे, राहणार खासपारा, वॉर्ड क्रमांक ५, कांकेर, जिल्हा कांकेर, छत्तीसगड अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरवेल मशीनवर मजुरी करणारे भूपेंद्र कुमार मडावी हे मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मालेगाव—वाशिम मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग १६१ वरून पायी जात होते. दरम्यान, अमानी गावाच्या पुलावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप राठोड, पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल गजानन वाणी तसेच वाहनचालक हेड कॉन्स्टेबल उमेश गिर्हे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच अमानी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक, पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक तसेच पोलीस कर्मचारी सचिन नवघरे, नंदकिशोर पाटील आणि सचिन जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू आहे.