अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला पुन्हा धमकी

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
मुंबई

 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी दोन संशयितांना दिल्ली आणि मुंबईतून अटक करण्यात आल्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने अमिताभ बच्चन यांना पुन्हा धमकी दिली आहे. तसेच, मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर खलिस्तान समर्थकांनी एकत्र जमावे, असे आवाहन त्याने केले आहे. या नव्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे.



१९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देत पन्नूने अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने १९ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर कथित खलिस्तान जलसा आयोजित करणाऱ्यांना ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आमिषही त्याने दाखवले आहे. त्यामुळे या आवाहनामागील हेतू आणि संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट रचल्याच्या प्रकरणात कालच दोन आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत दीपक सिंह ऊर्फ दीप याला ठाण्यातून, तर विकास ठाकूर ऊर्फ विकी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. या दोघांवर अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका आरोपीने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रेकी केली होती. त्यानंतर गोळीबाराचा कट आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित आरोपीचे बिष्णोई टोळीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला तो अनमोल बिष्णोईसाठी काम करत होता. मात्र, अनमोल बिष्णोईला मुंबईत आणल्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाई केली. सध्या अनमोल बिष्णोई न्यायालयीन कोठडीत आहे.

गोळीबाराच्या कटातील दोन्ही संशयितांना अटक झाल्यानंतर लगेचच पन्नूने अमिताभ बच्चन यांना धमकी दिल्याने या घटनांना अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. एका बाजूला बंगल्याबाहेर गोळीबाराच्या कटाचा तपास सुरू असताना दुसरीकडे त्याच ठिकाणी खलिस्तान समर्थकांना जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.