मुंबई,
amit-shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा उद्धव ठाकरे अस्वस्थ होतात, त्यांना रात्री झोप लागत नाही आणि त्यांची मानसिकता बदलते, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. भाजप आणि अमित शाह यांच्याविरोधात निराधार आरोप करणे ही ठाकरेंची सवय असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यातील एका कार्यक्रमात अमित शाह यांनी कोरोना महामारीच्या काळातील परिस्थितीचा उल्लेख करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या काळात अजित पवार त्यांच्याशी संपर्कात होते; मात्र मुख्यमंत्री फोनही उचलत नव्हते, असे शाह यांनी म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना शाह यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशला भेट देण्याचे आव्हानही दिले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय व सांस्कृतिक वारशाला विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा प्रकारचे आरोप बसत नसल्याचे सांगत, शरद पवार यांनी कधीही अशा पद्धतीने आरोप केले नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोहित पवार असे आरोप करत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणावर शरद पवार यांच्या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर बोलताना बावनकुळे यांनी एनडीएमध्ये नव्या पक्षांचा किंवा नेत्यांचा सहभाग झाल्यास आघाडी अधिक बळकट होईल, असे मत व्यक्त केले. एनडीएची ताकद वाढल्यास देशाच्या विकासालाही गती मिळेल. विकासाच्या मुद्द्यामुळेच अनेकांना एनडीएमध्ये सहभागी व्हावेसे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अभिनेते अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री कायदा-सुव्यवस्था राखण्यास सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमिताभ बच्चन असोत किंवा अन्य कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. कोणालाही त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे किंवा सुरक्षा व्यवस्थेत अडथळा निर्माण करणे शक्य होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.