५० लाखांची लाच मागितली, १२ लाख घेताना

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
CBI
अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) दाखल असलेल्या प्रकरणात खोटे आरोपी बनवण्यापासून वाचवण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) दोन सब-इन्स्पेक्टरना अटक केली आहे. तक्रारदाराला प्रकरणात खोटे अडकवू नये, यासाठी एका अधिकाऱ्याने सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर २५ लाख रुपयांमध्ये व्यवहार निश्चित झाला. यातील पहिला हप्ता म्हणून १२ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. अटकेनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर दिल्ली विभागीय युनिटमधील एनसीबीचा एक सब-इन्स्पेक्टर तथा तपास अधिकारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत सुरू असलेल्या एका प्रकरणात तक्रारदाराला खोट्या आरोपाखाली अडकवण्यापासून वाचवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

या तक्रारीची सीबीआयने प्राथमिक चौकशी करून सत्यता पडताळली. त्यावेळी संबंधित अधिकारी २५ लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या ठरलेल्या रकमेपैकी १२ लाख रुपये पहिला हप्ता म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून कारवाईची तयारी केली.

१४ नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. यावेळी एनसीबीच्या संबंधित सब-इन्स्पेक्टरने तक्रारदाराकडे १२ लाख रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारली. विशेष म्हणजे, हा लाचेचा व्यवहार एनसीबीच्या दुसऱ्या एका सब-इन्स्पेक्टरच्या माध्यमातून करण्यात येत होता. त्यामुळे लाचेच्या देवाणघेवाणीत सहभागी असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने रंगेहात ताब्यात घेत अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजीत सिंह मीणा आणि सुमीत कुमार अशी आहेत. अजीत सिंह मीणा हा एनसीबीच्या नवी दिल्लीतील आर. के. पुरम येथील दिल्ली विभागीय युनिटमध्ये सब-इन्स्पेक्टर आणि तपास अधिकारी म्हणून कार्यरत होता. तर सुमीत कुमार हाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सब-इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहे.अटकेनंतर दोन्ही आरोपींना सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणातील लाचेच्या व्यवहाराची चौकशी आणि पुढील तपासासाठी सीबीआयने पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लाचेच्या व्यवहारामागील संपूर्ण घटनाक्रम काय आहे, याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.