रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवरून दिपाली सय्यद संतापल्या

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
मुंबई
Dipali Sayyed
रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीवरून सुरू झालेला वाद आता अधिकच चर्चेत आला आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादात अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी उडी घेतली असून, त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तींचे वास्तव समाजासमोर आणण्यासाठी चित्रपटाची निर्मिती होत असेल, तर त्याला विरोध करण्याऐवजी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध करण्याऐवजी प्रेक्षकांनी आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर आपली भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.




‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटामुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वादाची ठिणगी पडली आहे. महिलांचे शोषण आणि भोंदूगिरी यांसारख्या गंभीर विषयांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावाचा, छायाचित्राचा आणि वैयक्तिक शैलीचा परवानगीशिवाय वापर केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना चित्रपटाच्या बाजूने आपली भूमिका मांडली.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “आपण नेमकं काय चुकीचं करत आहोत, हे मला समजत नाही. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीविरोधात चित्रपट तयार केला जात असेल, तर संबंधितांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना त्यांनी अशाच प्रकारे आवाज उठवला असता, तर अनेक महिलांचे शोषण रोखता आले असते.” चाकणकर यांच्या भूमिकेमुळे सेन्सॉर बोर्डाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून विरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आम्हाला सांगितले जात आहे. चित्रपट प्रदर्शित करू नका, असेही काही जणांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा दिपाली यांनी केला. इतकेच नव्हे, तर सेन्सॉर बोर्डाला ‘कुणाची ताकद मोठी ते बघुयात’, अशा शब्दांत आव्हान दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीच्या मुद्द्यावरही दिपाली सय्यद यांनी प्रश्न उपस्थित केले. विशेषतः साडी आणि नावाच्या ट्रेडमार्कचा संदर्भ देत त्यांनी या नोंदणीच्या व्याप्तीवरच सवाल केला. “साड्यांवर ट्रेडमार्क नोंदवायचा म्हणजे महाराष्ट्रातील महिलांनी साड्या नेसायच्या नाहीत का? राज्यात करोडो महिला साड्या नेसतात. त्याचप्रमाणे अनेक मुलींचे नावही रुपाली आहे. मग अशा प्रकारचा ट्रेडमार्क नेमका कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाला अनेक संस्था विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजात एखादी चुकीची घटना घडल्यानंतर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. मात्र, अशा प्रयत्नांमध्ये अनेकदा अडथळे आणले जातात, असे दिपाली म्हणाल्या. तरीही चांगले विचार आणि महत्त्वाचे विषय लोकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता अशा गोष्टींना थांबू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

“मी याच महाराष्ट्रात राहते. या महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मग आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमीत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आपण कशा खपवून घेणार?” अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. चित्रपटाला विरोध करण्यापूर्वी प्रेक्षकांनी तो पाहणे महत्त्वाचे आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील आशयाबाबत मत व्यक्त करावे किंवा त्याला विरोध करायचा असल्यास तो करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाभोवतीचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. ट्रेडमार्क नोंदणी, चित्रपटातील आशय आणि सेन्सॉर बोर्डाच्या प्रक्रियेवरून सुरू असलेल्या या वादावर आता रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.