भरधाव बुलेटच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
elderly-man-dies भरधाव बुलेटने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रोजी मानेवाडा रोडवरील एका बारसमोर घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी नारायण मेघश्याम पवार (२३) या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याशी पाहुण्यासारखी वागणूक देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
 
elderly-man-dies
 
राजेश बहादुरे (६५) असे मृताचे नाव आहे. ते उंटखाना परिसरातील रहिवासी होते. विविध बिअर बारमध्ये बर्फ पुरविण्याचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. १४ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त ते मानेवाडा रोडवरील एका बारमध्ये गेले होते. रस्ता ओलांडत असताना ओंकारनगरकडून शताब्दी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच ४९ सीएन ७०७०) क्रमांकाच्या बुलेटने त्यांना धडक दिली. आरोपी नारायण पवार हा भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचा आरोप आहे. अपघातानंतर तो वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात राजेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच छातीची चार हाडे मोडली. उपचारासाठी मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. सोमवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
आरोपीच्या वागणुकीवरून संताप
अपघातानंतर आरोपी नारायण पवार याला अजनी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. तो व्यापारीपुत्र असल्याने पोलिसांनी त्याच्याशी पाहुण्यासारखी वागणूक दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मृताच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.