अनिल कांबळे
नागपूर,
extortion-racket पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून देशातील आठ राज्यांतील सरपंचांना लक्ष्य करीत खंडणी उकळण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना फोन करून जाहिरातीसाठी पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी देणे, अशा पद्धतीने ही टोळी कार्यरत होती. या प्रकरणी मध्य प्रदेशातील भोपाळ येथून चार महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ लाख २९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी अप्पर अधीक्षक अनिल म्हस्के उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील काही महिला सरपंचांना बातमी छापण्याची धमकी देऊन फोन येत असल्याची तक्रार ८ नोव्हेंबर रोजी लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर नरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार सरपंच मीना सुरेशसिंग सूर्यवंशी यांना ११ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एका अनोळखी महिलेने ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन केला. जाहिरातीसाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी क्यूआर कोडही दिला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर विरोधात बातमी छापू, अशी धमकी दिली. याशिवाय जुनोना फुके येथील सरपंच प्रभा गोतमारे यांच्याकडून दिशाभूल करून ऑनलाइन ५०० रुपये स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले.
भोपाळमध्ये थेट कॉल सेंटर
या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंकुश माने यांनी केला. तांत्रिक पुराव्यांद्वारे भोपाळ येथे तीन ठिकाणी कॉल सेंटर चालविले जात असल्याचे उघड झाले. हर्षवर्धन नगर, निशातपुरा आणि एमपी-१ नगर परिसरातील या केंद्रांमध्ये एकूण ३५ महिला पगारावर काम करीत होत्या. या प्रकरणी मोनिका लालसिंग सूर्यवंशी (२८, रा. बगची, छतरी चौराहा, नरसिंहगढ, जि. राजगढ मध्यप्रदेश), नेहा लालसिंग सूर्यवंशी (२३), अक्षरा मिलिंद अरक (२१, रा. हुजूर, भोपाळ) आणि कोमल मोहन मोरे (२३, रा. अन्नानगर, भोपाळ) या चार महिलांना अटक करण्यात आली आहे.
महापंचायत पोर्टलचा गैरवापर
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांतील सरपंच व ग्रामसेवकांचे मोबाइल क्रमांक संकलित करण्यात आले होते. महापंचायत पोर्टलमधून सरपंचांचे मोबाईल क्रमांक मिळवले होते. तब्बल ६१८ रजिस्टरभर माहिती गोळा करण्यात आली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी, बिहारी आदी भाषेचे ज्ञान असलेल्या महिलांकडून संबंधित राज्यांतील सरपंचांशी संपर्क साधून पैशासाठी धमक्या दिल्या जात होत्या.
७.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
-५४ मोबाइल फोन
-२ लॅपटॉप, २ संगणक व १ प्रिंटर
- ६१८ मोबाइल क्रमांकांची नोंदवही
- छापील पाकिटे व पर्चे
- येस बँकेचे स्कॅनर, रिसीट स्लिप्स व चेकबुक
-एकूण जप्ती : ७ लाख २९ हजार २६० रुपये.